राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाकडून डीबीटीद्वारे थेट लाभ; अंगणवाडी नोंदणीला मोठा प्रतिसाद
साईमत / जळगांव
राज्य सरकारच्या ‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील २ हजार ६५१ मुलींच्या बँक खात्यात पहिला हप्ता जमा करण्यात आला आहे. महिला व बाल विकास विभागामार्फत ही रक्कम थेट डीबीटी (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे वितरित करण्यात आली असून, जिल्ह्यात एकूण १ कोटी ३२ लाख ५५ हजार रुपयांचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला आहे.
१ एप्रिल २०२३ पासून राज्यात सुरू करण्यात आलेल्या ‘लेक लाडकी’ योजनेचा उद्देश मुलींचा जन्मदर वाढवणे, त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे भविष्य सुरक्षित करणे हा आहे. या योजनेअंतर्गत मुलीला जन्मापासून १८ वर्षांपर्यंत टप्प्याटप्प्याने एकूण १ लाख १ हजार रुपयांचा लाभ दिला जातो.
यामध्ये जन्मावेळी ५ हजार रुपये, पहिलीत प्रवेश घेतल्यावर ६ हजार रुपये, सहावीत ७ हजार रुपये, अकरावीत ८ हजार रुपये आणि १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये असा टप्प्याटप्प्याने लाभ दिला जातो.
जळगाव जिल्ह्यात या योजनेसाठी मोठा प्रतिसाद मिळत असून, वर्षभरात ४ हजार ६९२ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी छाननीनंतर २,६५१ मुलींना पहिल्या हप्त्याचा लाभ मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ३,९४४ अंगणवाड्यांमधून आतापर्यंत १५ हजारांहून अधिक मुलींची नोंदणी झाल्याची माहिती समोर आली आहे.
योजनेच्या अटींनुसार पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबातील १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींनाच लाभ मिळतो. तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. लाभार्थीचे बँक खाते आधारशी संलग्न असणे अनिवार्य आहे.
या योजनेमुळे मुलींच्या शिक्षणाला आणि आर्थिक सुरक्षिततेला मोठा आधार मिळत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
