साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी
मुक्ताईनगर मतदार संघातील काही भागात शनिवारी, २५ मे रोजी सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. दरम्यान, अवकाळी पावसामुळे केळी पिकांचे नुकसान झाले आहे. मतदार संघात राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन यांनी आ.चंद्रकांत पाटील यांच्या समवेत नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून चौकशी केली. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, तहसीलदार, कृषी अधिकारी, संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली व पातोंडी भागात येथे झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे झालेल्या शेतीमध्ये केळीचे व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसानाची पाहणी केली. यावेळी आ.चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर तहसीलदार गिरीश वखारे तसेच संबंधित अधिकारी यांना सोबत घेऊन तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आणि सरकारकडून शेतकरी बांधवाना जास्तीत जास्त प्रमाणात मदत करण्याचे आश्वासित केले.
बोदवड तालुक्यातील मनुर खु., चिंचखेडा सीम व शिरसाळा भागातील गावांमध्ये झालेल्या वादळी व अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती, घरे, पशु-जनावरे यांचे नुकसान झाले आहे. बोदवड तहसीलदार तसेच संबंधित अधिकारी यांना सोबत घेऊन तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, बोदवड तहसीलदार, संबंधित गावातील ग्रामसेवक, शिवसेना पदाधिकारी, बोदवड नगराध्यक्ष आनंदा पाटील, नगरसेवक, कार्यकर्ते व गावातील ग्रामस्थ मंडळी तसेच शेतकरी उपस्थित होते.
रावेर तालुक्यातील मतदारसंघातील तांदलवाडी गावातील झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर घरांचे नुकसान झाले आहे. तसेच गावातील विजेचे पोल पडून भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानाची पाहणी करुन रावेर तहसिलदार तसेच संबधित अधिकारी यांना सोबत घेऊन तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश आ.पाटील यांनी दिले. याप्रसंगी माजी जि.प.उपाध्यक्ष नंदू महाजन, श्रीकांत महाजन, योगेश पाटील, निरंजन तायडे, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, गावातील ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.
नुकसानीचे तात्काळ पंचनामा करण्याचे दिले आदेश
मंत्री महाजन व आमदार चंद्रकांत पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून जिल्हाधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी यांना शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. दरम्यान, जिल्ह्यात तापमानाने उच्चांक केला आहे. नागरिकांनी उन्हापासून बचावासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही केले.
केळी बागांचे झाले नुकसान
गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्याने केळी बागेचे नुकसान होत असताना झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे मतदार संघातील रावेर व मुक्ताईनगर तालुक्यातील केळी पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला आहे.