साईमत, रावेर : प्रतिनिधी
सध्या सुरू असलेल्या भयंकर उन्हाळ्यात तापमानाने पंचेचाळीशी ओलांडली असल्याने नियमानुसार केळी उत्पादकांना फळ पीक विम्याचा लाभ मिळावा, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल हरीभाऊ जावळे यांनी कृषी आयुक्तांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, राज्यात लागू केलेल्या हवामान आधारित फळ पिक विमा योजनेतील केळी पिकासाठी लागू केलेल्या प्रमाणकांमध्ये लागू असलेल्या जादा तापमान ह्या निकषात असलेल्या १ ते ३१ मे दरम्यान ५ दिवस तापमान ४५ डिग्रीपेक्षा जास्त असल्यास हेक्टरी ४३,५०० रुपेय देय आहेत. त्या अनुषंगाने अलीकडेच जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावलसह अन्य सर्व तालुक्यात या कालावधीत तापमान ४५ डिग्रीपेक्षा जास्त असल्याचे निदर्शनास आलेले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, जास्त तापमान असल्यामुळे शेतकऱ्यांच्या केळी पिकाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. शेतकरी अत्यंत मेटाकुटीस आलेले आहे. शेतकऱ्यांना ह्या फळ पिक विमा योजनेतून त्वरित भरपाई देण्यास संबंधितांना आदेश व्हावेत, अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.