लेवा भाषेतील कवितांच्या सादरीकरणाने बहिणाबाईंचा वारसा समृद्ध होईल

0
7
oplus_2097154

लेवा गणबोली कवी संमेलनात मान्यवरांनी व्यक्त केला आशावाद

साईमत/जळगाव/प्रतिनिधी

विश्व लेवा गणबोली दिन आणि बहिणाबाई चौधरी यांच्या स्मृतिदिनानिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ग्रंथालया नजीक हिरवळीवर आयोजित लेवा गणबोली कवी संमेलनात शेतकरी, तरुण पिढी, संवेदनशील स्त्री जीवन आदी विषयांवरील लेवा भाषेतील दमदार कवितांच्या सादरीकरणाने बहिणाबाईंचा वारसा नव्या- जुन्या पिढीच्या समन्वयातून अधिक समृद्ध होत राहील, असा आशावाद व्यक्त झाला. मंगळवारी विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळेअंतर्गत असलेल्या बहिणाबाई चौधरी अध्ययन व संशोधन केंद्राच्यावतीने बहिणाबाई चौधरी स्मृतिदिनानिमित्त लेवा गणबोली कवी संमेलन आयोजित केले होते.

ग्रंथालयाच्या इमारतीत प्रशाळेबाहेरील हिरवळीवर कवी संमेलन पार पडले. उबदार थंडीत सकाळी बहिणाबाईंचा वारसा समृद्धपणे चालवण्याची ग्वाही देणारे कवी – कवयित्री जमले होते. प्रा. व.पू. होले, प्रा. संध्या महाजन, अरविंद नारखेडे, तुषार वाघुळदे, शीतल पाटील यांनी ताकदीच्या कविता सादर केल्या.

प्रा.संध्या महाजन यांनी ‘सुख आणि दुःख’ तसेच ‘धरित्रीचा धनी शेतकरी’ विषयावर कविता सादर केल्या तर अरविंद नारखेडे यांनी पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची आणि खान्देशाचा समृद्ध वारसा सांगणाऱ्या कविता सादर केल्या. तुषार वाघुळदे यांनी तरुण पिढीशी संवाद साधणारे त्याबरोबरच स्वप्न पाहणाऱ्या नेमक्या आशयाच्या कविता सादर केल्या. ‘मासिक पाळी’ विषयावर आणि ‘संसारातील स्त्री’ वर शीतल पाटील यांच्या कवितांना उत्स्फूर्त दाद मिळाली. प्रा.व.पु.होले यांनी ‘कोरोना काळातील अनुभवावर’ कविता सादर केली.

बोलीभाषेचे महत्त्व कमी होणे शक्य नाही

प्रा. होले यांचे व्याख्यानही झाले. त्यांनी बोलीभाषेचे सौंदर्य आपल्या भाषणातून विविध उदाहरणे देत स्पष्ट केले. व्यक्तिमत्व विकासासाठी बुद्धिमत्ता आणि भावनांक बरोबरीने असण्याची गरज आहे. तो केवळ बोलीभाषेतून अधिक समृद्ध होतो. मात्र, दुर्दैवाने बोलीभाषा ही गावठी ठरवून टाळली जाते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. बोलीभाषेतून संवेदना समोरच्या व्यक्तीच्या हृदयापर्यंत पोहोचतात. त्यामुळे बोलीभाषेचे महत्त्व कमी होणे शक्य नाही, असे सांगत प्रा.होले यांनी बहिणाबाई चौधरी मानवतावादी तत्त्वज्ञ होत्या, असे मत व्यक्त केले.

केंद्रातर्फे संशोधनात्मक लेखनासाठी अनुदान दिले जाणार

विचारधारा प्रशाळेचे संचालक प्रा. म.सु पगारे यांनी बोलीभाषा व बहिणाबाईंच्या कवितावर भाष्य केले. केंद्रातर्फे संशोधनात्मक लेखनासाठी अनुदान दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रातर्फे बहिणाबाईंवर संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठातर्फे संशोधन शिष्यवृत्ती दिली जात आहे. भविष्यात साहित्य संमेलन विविध स्पर्धा केंद्राकडून घेणार असल्याचेही प्रा. पगारे यांनी सांगितले. प्रास्ताविक केंद्राचे विभागप्रमुख डॉ. नितीन बडगुजर, सूत्रसंचालन स्नेहा गायकवाड तर गौरव हरताळे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here