भाविकांना मोठा दिलासा; काशी विश्वनाथ आणि राम मंदिरासाठी थेट प्रवासाची सोय
साईमत/ मुंबई
भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी मोठी भेट दिली असून दोन नवीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. या दोन्ही गाड्या मुंबई आणि पुणे परिसरातून धावणार असून थेट उत्तर प्रदेशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांशी कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देणार आहेत.
रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, एक अमृत भारत एक्सप्रेस वाराणसी (बनारस) ते पुणे हडपसर दरम्यान धावणार आहे, तर दुसरी अमृत भारत एक्सप्रेस अयोध्या ते मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान चालवली जाणार आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांच्यातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत होणार आहे.
वाराणसी–हडपसर अमृत भारत एक्सप्रेस (गाडी क्रमांक 02531) वाराणसीहून संध्याकाळी सुटून विविध महत्त्वाच्या स्थानकांवर थांबत हडपसर (पुणे) येथे पोहोचणार आहे. या मार्गावर प्रयागराज, झाशी, भोपाळ, इटारसी, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव आणि अहिल्यानगर यांसारखी महत्त्वाची स्थानके समाविष्ट आहेत.
तर अयोध्या–मुंबई अमृत भारत एक्सप्रेस सुमारे २८ तासांत प्रवास पूर्ण करणार असून सुलतानपूर, प्रयागराज, जबलपूर, इटारसी, भुसावळ, नाशिक रोड, कल्याण आणि ठाणे या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहे.
या दोन्ही गाड्यांमुळे काशी विश्वनाथ धाम, श्रीराम मंदिर अयोध्या आणि इतर तीर्थक्षेत्रांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होणार असून भाविकांसाठी ही मोठी सोय ठरणार आहे. प्रवाशांनी या नव्या सेवेचे स्वागत केले असून रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
