साईमत -चाळीसगाव – प्रतिनिधी |
चाळीसगाव तालुक्यातील कुंझर येथे घडलेल्या अत्यंत धक्कादायक प्रकरणात, विवाहितेवर बलात्काराचा प्रयत्न करून तिचा खून करणाऱ्या नराधम दीर प्रविण छगन बैरागी याला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सोबतच २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.
ही घटना २०१८ मध्ये कुंझर येथे घडली होती. पीडित महिला सासरी असताना आरोपी दीर प्रविण याने रात्रीच्या वेळी तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. महिलेने तीव्र प्रतिकार करताच आरोपीने तिचा गळा आवळून निर्घृण खून केला.
पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न निष्फळ
गुन्हा केल्यानंतर पुरावे लपवण्यासाठी आरोपीने मृत महिलेच्या गळ्यातील दोरी काढून लपवली होती. या कटात आरोपीची आई लिलाबाई छगन बैरागी हिनेही मदत केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. न्यायालयाने आरोपीच्या आईला पुरावे नष्ट केल्याप्रकरणी ३ वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
वैद्यकीय अहवाल, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि तपासातील भक्कम पुराव्यांच्या आधारे सरकारी पक्षाने मांडलेली बाजू ग्राह्य धरत न्यायालयाने हा महत्त्वाचा निकाल दिला.
