विधानसभेच्या निवडणुकीचा महासंग्राम रंगणार, विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर; आचारसंहिता लागू

0
18

२० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला निकाल  

साईमत/नवी दिल्ली/विशेष प्रतिनिधी

गेल्या अनेक दिवसांपासून नेमकी विधानसभा निवडणूक केव्हा घोषित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता विधानसभा निवडणुकीच्या तारख्यांची घोषणा झाली आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाईल आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी, १५ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीची घोषणा जाहीर केली आहे.

महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संपत आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. उमेदवारांना २२ ऑक्टोबरपासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरूवात होईल. २९ ऑक्टोबरपर्यंत ही प्रक्रिया पार पाडली जाईल. ३० ऑक्टोबर रोजी उमेदवारांच्या अर्जाची छानणी होईल आणि ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख राहील. २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

राजकीय घडामोडींना वेग येणार

निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताच जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात आता राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. आचारसंहिता जाहीर झाल्याने सर्व होणारे कार्यक्रम मंगळवार ऑक्टोबरपासून रद्द झाले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छूक असणाऱ्यांची भाऊगर्दी आता जिल्ह्यात दिसून येणार आहे. त्यामुळे निवडणुकीची रणधुमाळी यंदा चांगलीच रंगणार आहे. प्रमुख राजकीय पक्षांकडून कुणाची उमेदवारीसाठी वर्णी लागणार, त्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

यंदाची निवडणूक चांगलीच रंगतदार ठरणार

उमेदवारांच्या नावांची घोषणा प्रमुख राजकीय पक्षांना करावी लागणार आहे. आगामी दिवाळीच्या फटाक्यांसोबतच विधानसभेच्या निवडणुकीचा बारही उडणार आहे. यंदाची निवडणूक चांगलीच रंगतदार ठरणार असल्याने सर्वांचे मतदानासह मतमोजणीकडे लक्ष लागून राहणार आहे. सुमारे आजपासून पुढील दीड महिना हा निवडणुकीचा काळ असल्याने निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात होणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here