लोखंडी रॉड-विळ्याने हल्ला, ८ जणांवर गुन्हा
साईमत/ जळगाव / प्रतिनिधी
जळगाव तालुक्यातील आसोदा गावात किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. खुन्नस देणे व शिवीगाळ केल्याच्या कारणावरून रविवारी (१५ मार्च) दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेत लोखंडी रॉड आणि विळ्याचा वापर करून एका व्यक्तीला गंभीर दुखापत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आसोदा गावातील गॅरेज चालक शेख सलीम शेख लतीफ (वय ५४, रा. भादली रोड) यांना संशयितांनी शिवीगाळ केली. त्यानंतर जाहीद शेख रऊफ याच्यासह इतर सात जणांनी लोखंडी रॉड आणि विळा हातात घेऊन शेख सलीम शेख लतीफ यांच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात जखमी झालेल्या शेख सलीम शेख लतीफ यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
तक्रारीवरून जाहीद शेख रऊफ, रऊफ शेख समद, अमजद शेख समद, मुस्तकीम शेख समद, अर्शद शेख रऊफ, फैजान शेख रऊफ, शेख नसरीन बी शेख रऊफ आणि फातिमा बी शेख मुस्तकीम (सर्व रा. आसोदा, ता. जि. जळगाव) यांच्याविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ देविदास चिंचोरे करीत आहेत.
