सर्व घटकांच्या कल्याणासाठी कामकाज करणार : नवनिर्वाचित सभापती
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांच्या आदेशानुसार बाजार समितीच्या सभापतीपदी अशोक पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाचा माजी सभापती अशोक काशिनाथ भोयटे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर गारखेडा येथील अशोक प्रल्हाद पाटील यांची बिनविरोध निवड केल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या सभापती निवड सभेत माजी सभापती अशोक भोयटे, उपसभापती तुकडूदास नाईक यांच्यासह बाजार समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. सभापती पदावरील बिनविरोध निवडीनंतर सर्व सदस्यांनी अशोक पाटील यांचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदाच्या निवडणुकीसाठी आभासी अधिकारी म्हणून तालुक्याचे सहाय्यक निबंधक अधिकारी यांनी कामकाज पाहिले. तसेच सहकार अधिकारी महेंद्र गाढे, आर.एस. तायडे, बाजार समितीचे सचिव प्रसाद पाटील उपस्थित होते. बाजार समितीच्या सर्वांगिण विकासासाठी तसेच समितीशी निगडीत सर्व घटकांच्या कल्याणासाठी कामकाज करणार असल्याची भावना नवनियुक्त सभापती अशोक पाटील यांनी व्यक्त केली. निवडणुकीपूर्वी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या निवासस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व संचालकांची बैठक घेण्यात आली. यावेळी मंत्री गिरीष महाजन यांच्या आदेशानुसार सर्वानुमते अशोक पाटील यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते.
यांनी केला सत्कार
यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जामनेर तालुका एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, जे.के.चव्हाण, संजय गरुड, श्रीराम महाजन, डॉ.प्रशांत भोंडे, दीपक तायडे, अातिश झाल्टे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अशोक पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बाजार समितीचे सर्व सदस्य तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.