नंदुरबारची वाळू भुसावळ शहरात वेळेत न पोहचल्याने यावल तहसीलमध्ये वाळूसह ट्रॉला जमा

0
11

साईमत, यावल : प्रतिनिधी

बांधकाम उद्योग १२ महिने सुरू राहत असल्यामुळे वाळूला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. वाळू कोण कुठून आणि कशी कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या वाहनातून वाहतूक करेल हे आज सांगणे, अंदाज लावणे कठीण झाले आहे. त्यामुळे महसूल विभागासमोर एक मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्याच आव्हानातून गुरुवारी, ४ एप्रिल रोजी मध्यरात्री नंदुरबारकडून भुसावळकडे जाणारा साडेसहा ब्रास अवैध वाळू वाहतुकीचा ट्राला किनगावजवळ साकळी मंडळ अधिकारी व तलाठी यांनी पकडून यावल तहसील कार्यालयात जमा केला आहे.

सविस्तर असे की, यावल तालुक्यात अंकलेश्‍वर-बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावर रात्री १२ ते १२:३० वाजेच्या सुमारास किनगावजवळ नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील खनिजकर्म शाखा यांनी नंदुरबार येथून भुसावळ येथे वाळू वाहतुकीचा दिलेला परवाना साकळी मंडळ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बघितला. तेव्हा परवान्याची छायांकित प्रत दिसून आली. वाळू वाहतूक परवान्याची मुदत वेळ मात्र बुधवारी, ३ एप्रिल रोजी सायंकाळी १९:३० वाजेपर्यंत होती आणि आहे. ट्राला क्रमांक एमएच १५ एमएम ६०६० मध्ये साडेसहा ब्रास वाळू असल्याने तसेच परवान्याची छायांकित प्रत व वेळेचा संशय या कारणावरून ट्रॉला यावल तहसील कार्यालयात जमा केला. ही कारवाई तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली साकळी मंडळ अधिकारी जगताप व त्यांचे सहकारी तलाठी व महसूल कर्मचाऱ्यांनी केली.

अवैध वाळू वाहतुकदारांचा नवीन पॅटर्न

वाळू वाहतुकीत आतापर्यंत साधारणपणे डंपर, ट्रॅक्टर आदी वाहनांचा वापर केला जात होता. परंतु महसूल आणि पोलीस विभागाची दिशाभूल करण्यासाठी आणि अवैध वाहतुकीकडे दुर्लक्ष होण्यासाठी अवैध वाळू वाहतुकदारांनी आता छोटा हत्ती, बोलेरो या वाहनात व इतर काही वाहनांमध्ये बदल करून त्यातून वाळू वाहतुकीचा गोरख धंदा सुरू केला. याकडे महसूल आणि पोलीस विभागाने आपले लक्ष केंद्रित करून अशा अवैध वाळू वाहतूक वाहनधारक मालक चालक यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.

अवैध वाळू वाहतुकीच्या नवीन पॅटर्न आणि उद्योगात काही ठराविक तीन-चार तलाठी कर्मचाऱ्यांची भागीदारी असल्याचे चर्चिले जात आहे. काही जबाबदार अधिकारी, कर्मचारी यावल तहसीलदार यांची शुद्ध दिशाभूल करून आपला आर्थिक हेतू साध्य करून घेत असल्याचेही अवैध वाळू वाहतुकदारांमध्ये चर्चिले जात आहे.

ज्या काही वाळू वाहतुकदारांकडे परवाना असतो. त्या वाहन चालकाकडे वाळू वाहतुकीच्या परवान्याची छायांकित प्रत असते. मूळ प्रत त्यांच्याकडे का नसते. परवान्याला वेळेचे बंधन असताना एका परवान्यावर दिवसातून किती वेळा आणि किती ब्रास वाळू वाहतूक केली जाते आणि वाहन कोणते असते. त्याची खात्रीही महसूल विभागाने केल्यास मोठा घोळ उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here