साईमत/ न्यूज नेटवर्क । धानोरा, ता.चोपडा ।
धानोऱ्यासह परिसरातील देवगाव, बिडगाव, मोहरद, वरगव्हाण, कुंड्यापाणी, पुनगाव, पिंप्री, मितावली, पारगाव, पंचक आदी परिसरात अद्यापपर्यंत जोरदार पाऊस पडला नव्हता. जेमतेम पडणाऱ्या पावसावर शेतकरी वर्गाने उडीद, मूग, ज्वारी, मका, कापूस, सोयाबीन, बाजरी आदी पिकांची पेरणी झाली आहे. मात्र, शेतकरी वर्गाला जोरदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे. शेतकरी वर्गाचे चातक पक्षाप्रमाणे डोळे आभाळाकडे लागले होते. मात्र, गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धानोऱ्यासह परिसरात पेरण्यांनी जोर धरला आहे. त्यामुळे शेतकरी सुखावलेला दिसून येत आहे. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर चिंतेच सावट अखेर देवानेच कमी केल्याने बळीराजा देवाचे आभार व्यक्त करताना दिसून येत आहे.
गेल्या तीन दिवसांपासून अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे जमिनीची शांतता थोड्याफार प्रमाणात का होईना झाली आहे. उन्हाळ्यामुळे अंगाची जी लाहीलाही होत होती ती आता कमी होताना दिसून येत आहे तर बळीराजासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाऊस असल्यावरच बळीराजाला शेतीसाठी उपयुक्त असे पीक घ्यावे लागते. त्यासाठी पावसाची आवश्यकता महत्त्वाची असते. धानोरा परिसरात तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी राजा सकाळीच मजूर वर्गाला विनंती करून पेरण्यांना सुरुवात करीत आहेत. वेळ मिळेल तशी पेरणी करून प्रसंगी मजूर वर्गाला मजुरी जास्त देऊन एकदाची पेरणी करून घेत आहेत. त्याचप्रमाणे कापूस, ज्वारी, मूग, उडीद, मका या पिकांवर शेतकऱ्यांची जास्त आस आहे.
मजूर वर्गाला ‘सुगीचे’ दिवस
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केलेली आहे. तसेच पेरणीमुळे मजूर वर्गाला दोन पैसे जास्तीचे मिळत असल्यामुळे त्यांनाही ‘सुगीचे’ दिवस आले आहेत. ‘नाही घ्यायचा आरामाचं शेवटी आपल्या कष्टाचं’ अशा वाक्याप्रमाणे मजूर वर्ग सकाळी लवकर उठून शेताच्या कामाला सुरुवात करीत असताना नजरेस पडत आहेत. त्यामुळे मजूर वर्गाच्या चेहऱ्यावरही हास्य फुलताना दिसून येत आहे.
बाजारपेठेत तेजी
धानोरा परिसरात काही ठिकाणी पेरण्या झाल्या होत्या तर काही ठिकाणी पेरणी अद्यापही झालेल्या नव्हत्या. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून येणाऱ्या पावसामुळे पेरण्या पूर्णत्वास आल्या आहेत. त्यामुळे मजूर वर्गाला दोन पैसे जास्तीचे मिळत असल्याने आणि बळीराजा पेरणी केल्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. त्यामुळे बाजारपेठाही फुललेल्या दिसून येत आहेत. मजूर वर्गाला मिळालेल्या कष्टाच्या पैशामुळे बाजारपेठा तेजीत दिसून येत आहेत. तसेच शाळा, विद्यालयही सुरू झाल्यामुळे मजुराकडे हातात पैसा आल्यावरच आपल्या मुलांना वह्या, पुस्तके, दप्तर, कंपास पेटी विविध शालेय उपयोगी साहित्य घेण्यासाठी पालक वर्ग गर्दी करीत असतात. त्यामुळे बाजारपेठेत तेजी आलेली दिसून येत आहे.
बियाण्यांसह खते खरेदीसाठी गर्दी
बळीराजाकडे पैसा आल्यावरच बाजारातील मंदी दूर होते हे मात्र परंपरागत सत्य आहे. हे नाकारता येणार नाही हे मात्र खरे आहे. मजूर वर्गाला दोन पैसे कष्टाचे मिळाल्यावरच तो बाजारपेठेत आपला पैसा खर्च करू शकतो. तसेच दैनंदिन व्यवहार या पैशावर वरच अवलंबून असतात. धानोरासह परिसरातील शेतकरी तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे सुखावले आहे. गुरुवारी रोजी धानोरा गावाच्या बाजारात पडणाऱ्या पावसामुळे चांगलीच गर्दी दिसून आली. तसेच शुक्रवार रोजी विविध कृषी केंद्र धानोरा येथील सहकारी विकास सोसायटी याठिकाणी शेतकऱ्यांनी बियाणे, विविध रासायनिक खते घेण्यासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती. चातक पक्षाप्रमाणे आभाळाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहणारा शेतकरी पावसामुळे शेतात अगोदर जमिनीची पूजा करून पेरणी सुरुवात करीत असल्याचे चित्र नजरेस पडत आहे.