साईमत, फैजपूर : प्रतिनिधी
हिंदू धर्माचे पूजनीय श्रीराम म्हणजे भगवान विष्णूचा सातवा अवतार आहे. त्यांनी रावणाचा वध करण्यासाठी पृथ्वीवर श्रीराम यांच्या रूपाने जन्म घेतला. सोमवारी, २२ तारखेला अयोध्या येथे भगवान श्रीराम यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्यामुळे पूर्ण देशात दिवाळीसारखा सण अथवा सोहळा साजरा केला जात आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर एस. बी. चौधरी हायस्कुल, चांगदेव शाळेतील कलाशिक्षक राजू साळी (फैजपूर) यांनी आपल्या कल्पकतेने अतिवास्तववादी ‘श्रीराम’ शब्दाची अक्षररुपी ५५ बाय ३० या आकारात पोस्टर कलरच्या माध्यमातून पेंटिंग तयार केली आहे.
पेंटिंगमध्ये ‘श्रीराम’ हे नाव विटेवर उभे केलेले आहे. श्रीराम नावामध्येच रामाचे मुख व संकटकाळी रामास मदत करणारे हनुमंत यांचे मुख दाखविण्यात आलेले आहेत. तसेच रावणाचा वध करण्यासाठी तीर सुद्धा आहे. आकाशामध्ये अयोध्या दाखविण्यात आलेली आहे. राजू साळी यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितले की, अक्षररूपी श्रीरामाची पेंटिंग ही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्याचा मानस आहे.
