दिवसातून आठ ते दहा वेळा विद्युत पुरवठा होतोय ‘गुल’, महिलांसह व्यापारी वर्ग त्रस्त
साईमत/लोहारा, ता.पाचोरा /प्रतिनिधी :
येथे वीज महावितरण कंपनीचा मनमानी कारभाराला ग्रामस्थ कंटाळले आहे. लवकरच रास्ता रोको करण्याच्या तयारीत आहेत. कारण लोहारा हे गाव वीस ते पंचवीस हजार लोकवस्तीचे आहे. गावात नेहमीच खेड्यावरून मोठ्या प्रमाणात ग्राहक वर्ग आपापली कामे (इलेक्ट्रिकल्स उपकरणे) करण्यासाठी येत असतात. मात्र, गावात लाईट नसल्यामुळे ग्राहकांची वेळेवर कामे होत नसल्याने व्यापारी वर्ग नाराज आहेत. तसेच ऑनलाइन कामेही पूर्ण होत नाहीत. पिठाची गिरणी वेळेवर सुरु नसते. कारण लाईटच नसते. त्यामुळे महिला वर्ग त्रस्त झालेल्या आहेत.
दिवसातून तब्बल सात ते आठ वेळेस लाईट ‘गुल’ असते. कोणतीही वेळ ही महावितरण कंपनीला नाही. रात्री थकून आलेला शेतकरी वर्ग आरामाची झोप होत नसल्याने त्रस्त झालेला आहे. लाईट गेल्यावर महिन्याला मात्र वेळेवर बिल मोठ्या प्रमाणात येत आहे. शिल्लक काम जरी असले तरी वायरमन पूर्ण गावाची लाईट बंद करतात. अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचा काही एक समन्वय नसल्याने कोणतेही लाईट येण्या-जाण्याचे वेळापत्रक नाही. त्यामुळे कर्मचारी वर्ग मनमानी पद्धतीने महावितरण कंपनीचा कारभार चालवत आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच योग्य ती पावले उचलून लोहारा गावातील लाईट सुरळीत सुरु करावी. अन्यथा, जनतेच्या रोषाला अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागेल, अशी परिस्थिती होण्याचा सूरही उमटत आहे.
वीजपुरवठा सुरळीत सुरु करा
लाईट जाण्याची कोणती वेळ नाही. दिवसातून वेळोवेळी लाईट ‘गुल’ होत असते. त्यामुळे महिलांना फार मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. तसेच गावातील ऑनलाईन दुकाने पण बंद असल्याने नागरिकांची माहितीबद्दल नाराजी आहे. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत सुरु करावा, अशी आमची मागणी आहे.
-सुनील क्षीरसागर, ग्रामस्थ, लोहारा, ता.पाचोरा