यावल पं.स.च्या गटविकास अधिकाऱ्यांसह सहकाऱ्यांच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ ‘निळे निशाण संघटनेचे’ बेमुदत आमरण उपोषण

0
15

यावल तहसीलवर धडकला भव्य मोर्चा

साईमत/यावल/प्रतिनिधी

येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांसह सहकाऱ्यांच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ ‘निळे निशाण संघटनेचे’ संस्थापक-अध्यक्ष यांनी सुरु केलेल्या आमरण उपोषणाच्या चौथ्या दिवशी प्रकृती खालावल्याने संघटनेच्या शेकडो संतप्त कार्यकर्त्यांचा मंगळवारी, ८ ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजता तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा धडकला होता.शासन-प्रशासनाच्या नियमाचे उल्लंघन करून शासकीय कामात आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करून शासन-प्रशासनाला दिशाभूल करणारी माहिती देऊन अनु. जाती-जमातीच्या अनेकांना आपल्या मुलभूत हक्कापासून वंचित ठेवून जातीय द्वेष भावनेने मानसिक त्रास देऊन अन्याय करणाऱ्या गटविकास अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

यावल पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांसह संबंधितांनी कुठल्या विषयांवर शासन – प्रशासनाची दिशाभूल केली. तसेच अनु. जाती-जमातीच्या लोकांवर जाणीवपूर्वक अन्याय केला. निवेदनात क्रमवारी सविस्तर विषय नमूद केले आहेत. त्यामुळे न्याय देण्याच्या उद्देशाने नमूद विषयांवर विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहे.

भालशिव ग्रा. पं. अंतर्गत टेंभीकुरण गावाच्या नागरिकांकरिता निर्माण करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या संदर्भात अनेक वेळेस लेखी स्वरूपात निवेदन दिले. वेळोवेळी आंदोलने केली. तरीही गेल्या दोन वर्षात निवेदनाचे उत्तर यावल पंचायत समितीकडून मिळालेले नाही. नाशिक विभागीय आयुक्त यांनी जाहीर केलेल्या १९९२ मध्ये अधिसूचनेनुसार टेंभीकुरण हे गाव भालशिव ग्रा. पं. ला समाविष्ट आहे. टेंभीकुरण गावातील अनु . जाती-जमातींच्या लोकांना त्यांच्या मुलभूत हक्कांपासून का वंचित ठेवण्यात येत आहे. तसेच दोन वर्षापासून पिण्याच्या पाण्यापासून ते शालेय शिक्षणकामी व इतर महत्त्वाचा कामांकरिता लागणाऱ्या नोंदी तसेच ग्रामसेवकाकडून गावातील अनु. जाती-जमातीचे लोक ग्रामपंचायतचे कर भरण्यास तयार असतांना ग्रामसेवकांकडून ग्रा.पं.कर स्विकारण्यास नकार देण्यासंदर्भात चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी. जाणीवपूर्वक द्वेषभावनेतून दहिगाव-सावखेडा येथील रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनेसंदर्भात झालेली अनियमितता व झालेल्या गैरप्रकाराची चौकशी तसेच गटविकास अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे सावखेडा येथील रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल लाभापासून वंचित राहिलेल्या अनु. जातीच्या लाभार्थ्यांवर झालेल्या अन्यायासंदर्भात चौकशी करून कारवाई करण्यात यावी, असेही नमूद केले आहे.

विस्तार अधिकाऱ्यांची बदली करावी

गेल्या आठ ते दहा वर्षांपासून शासनाच्या नियमांची पायमल्ली करून तसेच निवडणूक आयोगाच्या आदेशाला न जुमानता पंचायत समितीचे विस्तार अधिकारी किशोर सपकाळे हे मनमानी कारभार करण्याच्या उद्देशाने यावल पंचायत समिती येथे तळ ठोकून बसलेले आहेत. त्यामुळे २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विपरित परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या कार्यकाळातील कामकाजाची चौकशी करून तात्काळ विस्तार अधिकारी किशोर सपकाळे यांची बदली करण्यात यावी, असेही नमूद केले आहे.

चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी

गेल्या दोन वर्षात जाणीवपूर्वक द्वेष भावनेतून टेंभीकुरण गावातील दलीत-आदिवासी समाजावर अन्याय केलेला आहे. तसेच टेंभीकुरण रस्त्याच्या संदर्भात वारंवार यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शासन-प्रशासनाची दिशाभूल केल्यासंदर्भात चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना देण्यात आले.याप्रसंगी संघटनेचे शेकडो महिला-पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी यावल पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here