कळमुस्ते, चिमणपाडाच्या प्रवाही वळण योजनेस मान्यता

0
3

साईमत, त्र्यंबकेश्‍वर : प्रतिनिधी
कळमुस्ते (ता. त्र्यंबकेश्‍वर) शिवारातील डोंगरगाव-दुगारवाडी गावाजवळ दमणगंगा खोऱ्यातील 690. 10 दशलक्ष घनफूट पाणी पावसाळ्यात गोदावरी खोऱ्यात 13. 68 किलोमीटर लांबीच्या बोगद्याव्दारे वळविण्याच्या 494 कोटी 98 लाख रुपये खर्चाच्या प्रवाही वळण योजनेला जलसंपदा विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.
तसेच पश्‍चिम वाहिनी नद्यांमधून अरबी समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून गोदावरी खोऱ्यात 29.29 दशलक्ष घनफूट पाणी आणण्यासाठी चिमणपाडी (ता. दिंडोरी) प्रवाही वळण योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ही योजना 36 कोटी 40 लाख रुपयांची आहे. जनहित याचिकेच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयातील 23 प्रवाही योजनांमध्ये या दोन्ही प्रवाही वळण योजनांचा समाव्ोश आहे. राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीच्या 25 फेब्रुवारी 2021 आणि 4 डिसेंबर 2020 च्या बैठकीत दोन्ही योजनांच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. वित्त विभागाच्या सहमतीने हे प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या बैठकीत सादर केले होते. मंत्रिमंडळाने 4 जुलै 2023 च्या बैठकीत दोन्ही प्रकल्पांना मान्यता दिली आहे. दमणगंगा नदीच्या स्थानिक नाल्यावर कळमुस्ते वळण योजना प्रस्तावित आहे. धरणापर्यंत पाण्याचा एकूण विसर्ग 817. 22 दशलक्ष घनफूट असून त्यापैकी 127. 06 दशलक्ष घनफूट पाणी स्थानिक वापरासाठी मृत साठ्यासह गृहीत धरुन गोदावरी खोऱ्यात पाणी वळवले जाणार आहे. चिमणपाडा योजनेच्या मूळ मंजूर आराखड्यात पाणलोट क्षेत्र 0.857 चौरस किलोमीटर असून त्यामध्ये दोन नाले आहेत. त्यावर दोन सॅडल प्रस्तावित आहेत.दोन सॅडलमध्ये 15.71 दशलक्ष घनफूट पाणी स्थानिक वापरासाठी ठेऊन उर्वरित पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार आहे. चिमणपाडा योजनेचा एकूण पाणीवापर 1. 334 दशलक्ष घनमीटर असून त्याद्वारे करंजवण धरणाचे 111 हेक्टर सिंचन क्षेत्र पुनर्प्रस्थापित होणार आहे. आळंदी धरणाचा संकल्पित उपयुक्त पाणीसाठा 816 दशलक्ष घनफूट इतका आहे. त्यामुळे जवळपास आळंदी धरणाइतके पाणी गोदावरी खोऱ्यात वळवले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here