साईमत धुळे प्रतिनिधी
येथील करिश्मा पाकळे सध्या पुणेस्थित पीआयसीटी महाविद्यालयात संगणकीय अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. अंतिम वर्षातील प्रकल्प प्रशिक्षणाच्या कालावधीत तिची आंतरराष्ट्रीय पातळीवरील बारलेक्स उद्योगसमूहाने निवड केली. त्यात तिच्यासह ग्रुपने व्याजदरासंदर्भात बँकिंग सॉफ्टवेअर तयार केले. त्यामुळे प्रभावित बारलेक्स समूहाने तिच्या सॉफ्टवेअरचा स्वीकार केला असून, तिच्या यशाबद्दल प्रशंसाही केली जात आहे.
करिश्माने येथील एसएसव्हीपीएस संस्थेच्या अभियांत्रिकीतील डिप्लोमा शाखेत ९५ टक्के गुण मिळवीत गुणवत्ता सिद्ध केली. या बळावर तिने पुणे येथील नामांकित पीआयसीटी संगणकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळविला.तिने तिसऱ्या वर्षात ९३ टक्के गुण मिळविले. यानंतर प्रकल्प प्रशिक्षण (इंटर्नशिप) कालावधीत तिची बारलेक्स समूहाने बँकिंग प्रकल्पासाठी निवड केली.यात अत्याधुनिक सॉफ्टवेअर तयार करताना करिश्माच्या गुणवत्तेचे कौतुकही झाले.ती धनगर समाजाचे ज्येष्ठ जिल्हा नेते देवीदास पाकळे यांची नात, तर माजी नगरसेवक तथा उद्योजक राहुल पाकळे, चारुलता पाकळे यांची कन्या आहे. करिश्मावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.