धनाजी नाना महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा
साईमत/फैजपूर/प्रतिनिधी
धनाजी नाना महाविद्यालयातील ग्रंथालयात मंगळवारी, १५ऑक्टोबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांच्या हस्ते डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.डॉ. शरद बिऱ्हाडे यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.
त्यांना डॉ. कलाम यांच्या जीवनातील कार्य तत्परता व देशसेवा जाणून घेण्याचे आवाहन केले. “विद्यार्थ्यांनी कलाम यांचे अनेक ग्रंथ वाचून त्यांचे विचार आत्मसात करावेत,” असे त्यांनी सांगितले.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांनी विद्यार्थ्यांना “विद्यार्थी दशेत ग्रंथाला आपले मित्र बनवावे” असा सल्ला दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासक्रमापुरते न थांबता, ग्रंथालयातील प्रेरक पुस्तकांचे वाचन करून जीवन समृद्ध करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. जाधव, उपप्राचार्या डॉ. कल्पना पाटील, प्रा.डॉ. जगदीश खरात, प्रा. विजय तायडे, प्रा.योगेश तायडे यांच्यासह विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या ग्रंथांचे विशेष प्रदर्शन भरविण्यात आले होते. यशस्वीतेसाठी उमाकांत पाटील, यामिनी पाटील, सुरेखा सोनवणे, भूषण पाटील यांनी परिश्रम घेतले.प्रास्ताविक तथा आभार ग्रंथपाल आय. जी. गायकवाड यांनी मानले.