नागपूर : वृत्तसंस्था
दोन वर्षे कोरोनामुळे सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल झाले. काहींच्या नोकऱ्या गेल्या तर काहींनी घरी बसून काम केले. कोरोनामुळे जगभरात लाखो नागरिकांचा मृत्यू झाला. काहींच्या घरचे कमावते पुरुष कोरोनाने मृत्युमुखी पडल्यामुळे त्यांची जगण्याची आशा संपली होती. कर्ता पुरुष गमावल्याने घरात लागणारा हातभार कमी झाला. काहींच्या नोकऱ्या गेल्या, काहींचे व्यवसाय बुडाले तर काहींचे संसार उध्वस्त झाले. मात्र घडलेले सर्व मागे टाकून आता कुठे माणूस स्थिरावला आहे. जीवनाची गाडी दोन वर्षानंतर पुन्हा रुळावर आली आहे. पण त्यातही सरकारने महागाई वाढवून सामान्यांना संकटात टाकले आहे. वीजबिल असो किंवा ये-जा करणारे साधन, घरघुती वापराचे गॅस असो किंवा फोन मधला रिचार्ज सर्वांच्या किमती वाढल्याने सर्वसामान्य जनतेला ते परवडेनासे झाले आहे. दुसरीकडे आता सरकारने ताटावरच निशाना केलाचे दिसत आहे. खाद्यांन्नांवर पाच टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणून आता अन्नधान्यही महाग होणार आहे. वीज बिल वाढल्याने भरमसाठ बिल येते. वीज ही प्रत्येकाची गरज आहे. बिल भरले नाही तर महावितरण लगेच दुसऱ्या महिन्यात वीज कापते. महावितरणाकडून सरसकट वीज बिल पाठविले जात आहे. दोन खोल्यांच्या घरालाही दोन हजार रुपये असा सरासरी बिलाचा हिशोब लावला जातोय का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून रीडिंगनुसार बिल येते हा महावितरणचा दावा आता चुकीचा ठरत आहे असे बोलले जात आहे.
खाद्यांन्नांवर पाच टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. त्यामुळे गहू, तांदूळ, दही, पनीर, मासे, सोयाबीन, मटर यांसारख्या दररोज वापरण्यात येणाऱ्या छोट्या-छोट्या वस्तूंची किंमत वाढणार आहे. येत्या काही दिवसात तूर डाळ पुन्हा १२५ ते १३० रुपये किलोवर जाण्याची शक्यता आहे. हरभरा डाळ, उडीद मोगर, मुग मोगर डाळीच्या दरात चढ उतार होता. सर्वसामान्यांना महागाईचा खूप मोठा झटका बसणार आहे. त्यांच्या ताटातील वरण, पोळीही गायब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जीएसटी काउंसिल बैठकीमध्ये जीएसटी वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता सर्वसामान्यांना आणखी महागाईचा सामना करावा लागणार आहे. पॅक असलेले आणि लेबल असलेले मासे, दही, पनीर, लस्सी, मध, सुका मखाना, कोरडे सोयाबीन, मटार, गहू आणि इतर तृणधान्ये आणि तांदूळ यांसारख्या उत्पादनांवर आता पाच टक्के जीएसटी लागू होणार आहे.
आतापर्यंत या वस्तूंना जीएसटीमध्ये सूट देण्यात आली होती. त्यामुळे आता महागाई वाढणार आहे. सर्वसामान्य जनतेचा बजेट पूर्णपणे विस्कळित होणार आहे. जीएसटी विरोधात व्यापाऱ्यांनी शनिवारी बाजार बंद ठेवला होता. त्या बंदला देशभरात चांगला प्रतिसाद मिळाला. अद्यापही केंद्र सरकारने जीएसटी निर्णय मागे घेतलेला नाही. ग्राहकांना मात्र या महागाईचा चांगलाच सामना करावा लागणार आहे. सतत होणाऱ्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचा फटका बाजारात दिसण्याची शक्यता आहे. निर्यातीमुळे देशातील गव्हाचा साठा कमी झाल्याने गव्हासह आटा, रवा, मैद्याच्या दरात वाढ झालेली आहे.