नाशिक : प्रतिनिधी
लाचलुचपत विभागाच्या नाशिक येथील पथकाने अहमदनगरमध्ये मोठी कारवाई केली आहे. १ कोटींच्या लाचखोरी प्रकरणात दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक केली आहे. रस्ते आणि इतर विकासकामांचे बिल काढण्यासाठी ही लाच मागितली होती. याप्रकरणी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी दुपारी ही कारवाई केली. अहमदनगर एमआयडीसीतील सहाय्यक अभियंता अमित गायकवाड यांना लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली. यानंतर संबंधित प्रकरणात सहभागी असणारे धुळे कार्यालयातील कार्यकारी अभियंता गणेश वाघ यांनाही अटक करण्यात आली.
अहमदनगर परिसरात रस्त्यांसह विविध विकासकामांचं तीन ते साडेतीन कोटींचं बिल काढण्यासाठी एका ठेकेदाराकडे १ कोटींची लाच मागितली होती. अहमदनगर एमआयडीचे सहाय्यक अभियंता अमित गायकवाड यांनी ही लाच मागितली होती. यामध्ये अहमदनगरचे तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ यांचाही हिस्सा होता. वाघ यांच्या सहीशिवाय संबंधित बिलं निघणार नव्हती. त्यामुळे ही लाच मागण्यात आली होती.
याबाबत माहिती देताना महाराष्ट्राचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक विश्वास नांगरे पाटील म्हणाले की, २२ ऑक्टोबर रोजी संबंधित घटनेची पुष्टी करण्यात आली होती. सुरुवातीला या लाचखोरीबाबत वाटाघाटी झाल्या. ७५-८५ लाखांपासून ही वाटाघाटी सुरू होती. दरम्यान, आम्हाला तत्कालीन उपविभागीय अभियंत्याविरोधात चांगले पुरावे मिळाले. वाटाघाटी झाल्यानंतरही आरोपींनी एक कोटी रुपयांची मागणी कमी केली नाही. शुक्रवारी (३ नोव्हेंबर) दुपारी सव्वा दोनच्या सुमारास नाशिक पथकाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी लाचेची रक्कम स्वीकारताना आरोपी सहाय्यक अभियंत्याला रंगेहात पकडले.
मूळा धरण ते टेहेरे या भागातील जल वाहिनी कामाचा ३१.६७ कोटींचा ठेका तक्रारदाराला मिळाला होता. या कामासाठी ९४ लाख सुरक्षा रक्कम आणि एक कोटी ६८ लाख रुपये अनामत रक्कम ठेवली होती. काही कामाचे देयक प्रलंबित आहे. ते मिळवून देण्यासाठी २० ऑक्टोबर रोजी संशयितांनी तक्रारदाराकडे एक कोटींची लाच मागितली होती. तक्रारदाराने तडजोडीचा प्रयत्न करूनही संशयितांनी रक्कम कमी केली नाही. तडजोडीवेळी झालेल्या संभाषणाचे पुरावे तपास यंत्रणेकडे आहेत. एक कोटीची रक्कम सहायक अभियंता अमित गायकवाडने अहमदनगर येथे स्वीकारली. नंतर कार्यकारी अभियंता वाघशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. तेव्हा एकाने ‘तुझ्या कष्टाचे चांगले फळ मिळाले ’ अशा शब्दात भावना व्यक्त केली. त्यानंतर क्षणार्धात गायकवाडला पथकाने रंगेहात पकडले.
भ्रष्टाचार समूळ उच्चाटनासाठी प्रभावी मोहीम
शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सध्या दक्षता जनजागृती सप्ताह राबविला जात आहे. त्या अंतर्गत राज्यात विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहे. ‘लाच घेणे व लाच देणे’ हे दोन्ही गुन्हे आहेत. सामाजिक प्रगतीत भ्रष्टाचार हा मुख्य अडथळा आहे. त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जनजागृती आणि विभागाकडून प्रभावीपणे कारवाई केली जात असल्याचे नांगरे पाटील यांनी नमूद केले. मागील १० महिन्यांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्यात ७०० सापळा कारवाई, अपसंपदेचे १५ जणांविरुध्द आठ गुन्हे आणि अन्य भ्रष्टाचाराच्या तीन गुन्ह्यांत ४३ जणांवर कारवाई केली. यात नाशिक विभाग आघाडीवर आहे.