साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी
विवेकानंद प्रतिष्ठान संचलित, काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये, पूर्व प्राथमिक विभागात “आजी-आजोबा मेळावा” उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी आजी आजोबांचे स्वागत ज्युनिअर केजीच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून व त्यांनी स्वहस्ते बनवलेले ग्रीटिंग कार्ड देऊन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे अरविंद मार्तंड देशपांडे तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा शोभाताई पाटील, माध्यमिक विभागाच्या समन्वयिका संगीता तळेले यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आली.
ज्युनिअर केजीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून आजी-आजोबांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या प्रमुख नीलिमा शुक्ला होत्या. त्यांनी अध्यक्षांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या प्रास्तविकेनंतर आजी-आजोबांसाठी वेगवेगळ्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात फुंकर मारून कप उडवणे, तसेच प्रश्न उत्तरांचा खेळ घेण्यात आला. आजी आजोबांना वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले होते व त्यांचे त्यांनी अतिशय समर्पक अशी उत्तरे दिली. त्यानंतर गाण्यांच्या कडव्या वरून ध्रुवपद ओळखणे अशा प्रकारचा मनोरंजनात्मक खेळ आजी-आजोबांसाठी घेण्यात आला.
आजी-आजोबांनी सर्व खेळांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला व खेळाचा आनंद लुटला. आपल्या नातवंडांच्या सहवासात खेळ खेळून त्यांना खूप आनंद मिळाला. खेळात विजयी झालेल्या आजी- आजोबांना अध्यक्षांच्या हातून पारितोषिक म्हणून छान छान अशी प्रेरणादायी पुस्तके देण्यात आली. तसेच त्यानंतर प्रमुख पाहुणे व आजी आजोबांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. आजी-आजोबांनी संपूर्ण कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. त्यानंतर आभार प्रदर्शन व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमानंतर आजी-आजोबांनी आपल्या नातवंडांचे वर्ग बघितले, शाळेला भेट दिली तसेच वर्ग शिक्षिकांची संवाद साधला. कार्यक्रमाला समन्वयिका अनघा सागडे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.