अधिकाऱ्यांनी दिव्यांग बांधवांच्या मागण्यांकडे तत्काळ लक्ष दिले.
साईमत/पाचोरा /प्रतिनिधी :
विविध मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील दिव्यांग बांधवांंनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर केलेले उपोषण संबंधित अधिकाऱ्यांनी प्रश्न सोडविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर मागे घेण्यात आले.
तालुक्यातील शिंदाड येथील काही दिव्यांग बांधवांनी त्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केले होते. या उपोषणामुळे प्रशासनाला तातडीने हस्तक्षेप करावा लागला आणि संबंधित अधिकाऱ्यांनी दिव्यांग बांधवांच्या मागण्यांकडे तत्काळ लक्ष दिले.
उपोषण स्थळी पाचोरा प्रांताधिकारी भुषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, गटविकास अधिकारी सुधाकर मुढे, पिंपळगाव-शिंदाड गटातील माजी जि.प. सदस्य व भाजप जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे, विस्तार अधिकारी ए. जे. पाटील, दीपक शिंदे, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर पाटील, विस्तार अधिकारी सुरवाडे तसेच शिंदाड ग्रामपंचायत अधिकारी श्री. शिवणेकर उपस्थित होते.
त्यांनी दिव्यांग बांधवांच्या मागण्यांची तात्काळ दखल घेत लेखी आश्वासन दिले आणि उपोषण समाप्त केले.उपोषण स्थळी चार ते पाच दिव्यांग बांधव चटईवर बसलेले दिसले. त्यांच्या मागण्यांसाठी लहानसा बॅनर ठेवण्यात आलेला होता. पत्रकार राजेंद्र पाटील यांनी त्यांच्या जवळ जाऊन परिस्थिती समजून घेत प्रशासनाशी संपर्क साधला. त्यांनी उपोषण सोडविण्यासाठी दिव्यांग बांधवांना समजावून सांभाळले.
गटविकास अधिकारी सुधाकर मुढे यांनी सर्व विषयांवर सकारात्मक सहकार्याची ग्वाही दिली. दिव्यांग बांधवांनी मिळालेल्या प्रतिसादामुळे समाधान व्यक्त केले. प्रशासनाच्या तत्परतेमुळे नागरिकांमध्ये विश्वास वाढल्याचेही दिसून आले.
