साईमत, धुळे : प्रतिनिधी
महाराणा प्रताप पुतळा ते खोडाई माता परिसर लक्झरी बस बेशिस्त व वाहतुकीला अडथळ्यासंदर्भात मागणी केली असता नंदुरबार शहर वाहतूक शाखेत यासंदर्भात बैठक झाली. त्यात गणेशोत्सवानंतर गावाबाहेर गाड्या लावाव्यात व लक्झरी थांब्याचे नियोजन करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. बैठकीला नंदुरबार वाहतूक शाखेत वाहतूक निरीक्षक भरत जाधव, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी यांच्यासह लक्झरी चालक-मालक उपस्थित होते.
लक्झरींनी रस्त्यावर फेकलेली काच तसेच रहदारीला अडचण निर्माण होईल असे दिवसभर गाड्या रस्त्यावर उभ्या करून ठेवणे व सायंकाळी एकाचवेळी सर्व लक्झरी भरणे यावर चर्चा झाली. त्यावर शिंपी यांनी सांगितले की, एकूण १३ लक्झरी आहेत. सर्वांचा सुटण्याचा वेळ साधारण सायंकाळी सहा ते सात आहे. त्यामुळे प्रवाशांची तसेच त्यांच्यासोबत येणाऱ्यांची प्रचंड गर्दी होते. एक ते दीड तास रस्ता ब्लॉक होतो. यासंदर्भात १३ गाड्यांचे विभाजन केले जाईल. काही धुळे रोड, काही गावातील मुख्य मोकळ्या जागेवर असे चार थांबे करण्याचा निर्णय झाला. जेणेकरून १३ गाड्या एका जागेवर उभ्या राहणार नाहीत. त्याचप्रमाणे खोडाईमाता रोडवर दिवसभर लक्झरी बस लावून अडथळा निर्माण करतात. त्यांनी तेथे न लावता गावाबाहेर व ट्रक टर्निमलकडे लावाव्यात, अशा दोन्ही सूचनांवर चर्चा करण्यात आली. त्यावर लक्झरी बसचालकांनी मान्य केले आहे. यासंदर्भात लवकरच वाहतूक शाखा व प्रवासी संघटना काही जागांची पाहणी करणार आहेत. त्यानुसार लक्झरी बस लावण्याचे थांबे निर्धारित केले जातील, असे बैठकीत ठरले.