आदित्य ठाकरेंनी युवासेनेत हकालपट्टीचे सत्र केले सुरू

0
3

साईमत लाईव्ह पुणे प्रतिनिधी :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. त्याचपाठोपाठ शिवसेनेतील ४० आमदार शिंदे गटात सामील झाले. आमदारांनंतर खासदार आणि पदाधिकाऱ्यांनीही एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांनी बंडखोर नेत्यांची हकालपट्टी केली. बंडखोरी आता युवासेनेतही पोहोचली आहे. अनेक तरुण कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांना संघटनेतून काढून टाकले आहे.

युवासेना सचिव पूर्वेश सरनाईक आणि सहसचिव किरण साळी यांना आदित्य ठाकरे यांनी काढून टाकले आहे. पक्षाविरोधी कारवाई केल्याचा दावा करून या दोघांची युवासेनेतून हकालपट्टी केली आहे. युवासेनेचे पुण्यातील मोठे नेते म्हणून किरण साळी यांची ओळख आहे. किरण साळी हे माजी मंत्री आणि आमदार उदय सामंत यांचे समर्थक आहेत. उदय सामंत हे एकनाथ शिंदे गटात सामील झाल्यानंतर पुण्यात युवसेनेला फूट पडणार हे निश्चित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किरण साळी यांची युवासेना महाराष्ट्र राज्य सचिवपदी नियुक्ती करण्याचे जाहीर केले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आक्रमक होऊन साळी यांची हकालपट्टी केली आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडून सचिवपदी नियुक्ती जाहीर झाल्यानंतर साळी हे मेळाव्यात बोलले होते. “आजपर्यंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारानुसार व शिकवणीनुसार शिवसेनेत १५ वर्षे काम केले. संघर्ष करताना विविध आंदोलनांमुळे अनेक केसेस माझ्यावर झाल्या. मात्र मी कधीही डगमगलो नाही. सतत पक्षहित समोर ठेवून पक्षबांधणीसाठी काम केले. मात्र कधीही मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले नाही. आज मुख्यमंत्र्यांना ग्वाही देतो की, तुम्ही द्याल ती जबाबदारी व सांगाल ते काम मी प्रमाणिकपणे करीन. आगामी काळात माझे मार्गदर्शक माजी मंत्री उदय सामंत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी अव्याहत कष्ट घेऊ आणि संघर्ष करू, असे किरण साळी मेळाव्यात बोलताना म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here