साईमत, जामनेर : प्रतिनिधी
जळगाव येथे नुकत्याच घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत येथील स्वराज्य प्रतिष्ठान संचलित पोदार जीनियस इंटरनॅशनल स्कुल शाळेने यावर्षी पहिल्यांदाच आपला सहभाग नोंदविला होता. तसेच नाटकात अभिनव नंदलाल पाटील ह्या चिमुकल्याने उत्कृष्ट भूमिका साकारुन तोही राज्य बाल नाट्य स्पर्धेत चमकला. तो डॉ.नंदलाल पाटील यांचा चिरंजीव आहे.
उत्कृष्ट कथालेखन, पात्रांचा जिवंतपणा, साजेसे नेपथ्य आणि प्रेक्षकांच्या टाळ्या यामुळे छत्रपती संभाजीराजे नाट्य सभागृहात सादर झालेल्या ‘सुपर पावर’ नाटकाचे लेखन-दिग्दर्शन संतोष मधुकर शिराळे यांनी केले होते. नाटकात कलाकार म्हणून विद्यार्थ्यांनी आपापली भूमिका उत्कृष्ठपणे साकारली. याच नाटकात पात्र साकारणाऱ्या अभिनव पाटील ह्या चिमुकल्या कलाकार विद्यार्थ्याला गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. याबद्दल नाटकाचे लेखक-दिग्दर्शन करणारे संतोष शिराळे यांच्यासह स्वराज्य प्रतिष्ठान, पोदार जीनियस स्कुलचे सर्व पदाधिकारी, सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनवचे कौतुक केले आहे.