तालुक्यात आज पहाटेच एका तरूणाचा अतिशय क्रूर पध्दतीत खून झाल्याचे आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे

0
23

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी

या संदर्भातील वृत्त असे की, यावल तालुक्यातील सांगवी फाटा ते डोंगरकठोरा रस्त्यावर आज पहाटे एका तरूणाचा छिन्नविछीन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. ग्रामस्थांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यात मृत व्यक्ती हा मनोज संतोष भंगाळे (वय ४०) असून तो चितोडा येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. मनोज भंगाळे हे कुणाच्या अध्यात-मध्यात पडत नसून ते शेती आणि प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली आहे.

मारेकर्‍यांनी अतिशय क्रूर पध्दतीत मनोज भंगाळे यांना संपविले आहे. त्यांच्या गळ्यात फास टाकून कोणत्या तरी वाहनाने त्यांना ओढून आणत रस्त्याला लागून असणार्‍या शेतात त्यांचा मृतदेह टाकण्यात आला आहे. तसेच, त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने अनेक वार करण्यात आल्याचेही आढळून आले आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरिक्षक राकेश मानेगावकर, उपनिरिक्षक विनोद खांडबहाले आणि त्यांच्या सहकार्‍यांनी दुर्घटना स्थळी धाव घेऊन पंचनामा करत या क्रूर घटनेचा तपास सुरू केला आहे. परिसरातील ग्रामस्थांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मयत मनोज भंगाळे याचा मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रूग्णालयात पाठविण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून चर्चेला उधाण आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here