साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
नोकरी करीत असतांना सामाजिक भान आणि जाणीव ठेवत चाळीसगाव सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्यावतीने येत्या पावसाळ्यात ‘निर्धार हरितक्रांतीचा, वसा वृक्षसंवर्धनाचा’ अंतर्गत सिडबॉलच्या माध्यमातून औषधी आणि उपयुक्त झाडांची बी निसर्गात टाकण्याच्या उपक्रमासाठी एक लक्ष सिडबॉल तयार केले जात आहेत. त्यासाठी अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंतासह कर्मचारी पुढे सरसावले आहे. साप्ताहिक श्रमदान शिबिरातून सीडबॉल्स आणि रोप पिशव्या तयार करण्यात येत आहेत.
चाळीसगाव तालुक्यातील अनेक औषधी व उपयुक्त वृक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यात नष्ट होत असलेले वैभव वाचविण्याच्या दृष्टीने तसेच तापमानात होणारी वाढ़, वातावरणातील बदल त्यामुळे निसर्गचक्र बदलत आहे. उष्माघात सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेता पर्यावरण समृद्धीसाठी चाळीसगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने एक लक्ष सीड बॉल्स रुजविण्याचा अनोखा उपक्रम राबविला जात आहे. या क्षेत्रात कार्यरत असलेल्या तज्ज्ञ मंडळींचे सहकार्य घेत लाखो सिडबॉल तसेच नानाविध रोप पिशवी तयार करण्यात येत आहेत. त्यात विविध झाडांच्या बिया, गोमय माती आणि जीवामृत यांच्या माध्यमातून उपक्रम राबविला जात आहे. गेली अनेक वर्षे वृक्षलागवड तसेच वृक्ष संगोपनात महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या या विभागाने यंदा एक लाखाहून अधिक सिडबॉल्स आता तयार केले आहे. पाच ते सहा हजार रोप पिशव्या तयार केलेल्या आहेत
अनेकविध औषधीयुक्त बियांचा समावेश
श्रमदान शिबिरातून तयार करण्यात येणाऱ्या सिडबॉल्समध्ये चिंच, काशीद, गुलमोहर, करंज, काशीद, वड, पिंपळ, पैलट्रोफार्म, पळस, बकुळ तसेच अनेकविध औषधीयुक्त बियांचा समावेश आहे. उपविभाग अंतर्गत येणाऱ्या प्रमुख रस्त्यावरून जाताना दोन्ही बाजूस सिडबॉल्स टाकले जाणार आहे. मोहिमे दरम्यान सीड बॉल्स माध्यमातून राबविण्यात आलेल्या बिया रुजतील व वाढतील, असे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी सांगितले.
लागवडबाबतचा आराखडा तयार
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सीड बॉल्स हा अनोखा उपक्रम कमी खर्चिक आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त झाडे जगविण्याचा मानस विभागाचा आहे. विभागाअंतर्गत येणारे हॅम, सोबतच नव्याने तयार झालेले राज्य दर्जाचे मार्ग याठिकाणी चाळीसगाव हद्दीत सीड बॉल्सची मोठ्या प्रमाणात लागवडबाबतचा आराखडा तयार करण्यात केला असल्याचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे यांनी सांगितले.
भविष्यात निसर्ग संपदेत पडणार भर
भीषण दाहकतेच्या प्रतिकूल परिस्थितीत वनीकरणाचा विचार रुजवायचा असेल तर त्यासाठीची पद्धत बदलावी लागेल ही बाब लक्षात घेऊनच यंदा विभागामार्फत बियांची रुजवात करण्यासाठी सीड बॉल्स ही अत्यंत सोपी, स्वस्त आणि उपयुक्त संकल्पना राबविण्यात आली आहे. शेणखताचे पोषण, मातीचा ओलावा यामुळे सीड बॉलमधील बिया चटकन रुजतील. हवेतील आर्द्रता, मातीची ओल आणि अधून-मधून पावसाचा शिडकावा हे सर्व अनुकूल झाल्यास निश्चितच भविष्यात निसर्ग संपदेत भर पडेल, असे मत उपविभागीय अभियंता अनिल बैसाणे यांनी व्यक्त केले.