पाळीव प्राण्यांची निघणार १५ ऑगस्टला ‘पेट परेड’ स्वातंत्र्य दिनाचा अनोखा सोहळा
साईमत /ठाणे/ प्रतिनिधी :
स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाला अनोखा आणि आकर्षक रंग देण्यासाठी ठाण्यात यंदाही ‘स्वातंत्र्य दिन पेट परेड’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘डॉग्स वर्ल्ड इंडिया’च्या वतीने शनिवार, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहापासून या परेडला सुरुवात होणार असून डॉग्स वर्ल्ड इंडिया येथे तिचा समारोप होणार आहे. देशभक्तीची भावना आणि पाळीव प्राण्यांप्रती असलेले प्रेम यांचा अनोखा संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळणार आहे.
ठाणे शहरात उपवन महोत्सव, पेट फेस्ट यांसारख्या विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. त्याच पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेली ही पेट परेड यंदाही नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. २०२२ मध्ये या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. पहिल्याच वर्षी दोनशेहून अधिक पाळीव प्राण्यांच्या पालकांनी सहभाग नोंदविला होता. त्यानंतर ही परेड ठाण्यातील पाळीव प्राणीप्रेमींसाठी वार्षिक आकर्षण बनली आहे.
यंदाच्या परेडमध्ये विविध जातींचे श्वान, मांजरी तसेच अन्य पाळीव प्राणी आपल्या पालकांसह सहभागी होणार आहेत. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अनेक पाळीव प्राण्यांना तिरंग्याच्या रंगातील आकर्षक पोशाख परिधान करण्यात येणार आहे. काही सहभागी हातात तिरंगा घेऊन तसेच देशभक्तीपर घोषणा देत परेडमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे परेडच्या मार्गावर देशभक्तीचे वातावरण निर्माण होण्यासोबतच रंगीबेरंगी वेशभूषेतील पाळीव प्राण्यांचे आकर्षक दर्शन नागरिकांना घडणार आहे.
डॉ. घाणेकर नाट्यगृहापासून सुरुवात
डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे पश्चिम येथून सकाळी ८ वाजता पेट परेडला सुरुवात होईल. त्यानंतर परेड डॉग्स वर्ल्ड इंडिया येथे पोहोचणार आहे. पाळीव प्राण्यांचे पालक तसेच प्राणीप्रेमींनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक प्रमोद निंबाळकर यांनी केले आहे.
स्वातंत्र्य दिनाचा उत्साह, देशभक्तीची भावना आणि प्राण्यांवरील प्रेम यांचा सुंदर मिलाफ घडविणारी ही पेट परेड ठाणेकरांसाठी यंदाच्या स्वातंत्र्य दिनाचे खास आकर्षण ठरणार आहे.
