विचारांना चालना देणारं विद्यार्थ्यांच्या कलागुणांचं दर्शन

0
1

साईमत जळगाव प्रतिनिधी

अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे वर्षभरात कलेतील विविध प्रकारांचे प्रशिक्षण घेतले जाते. यातून स्कूलच्या विद्यार्थ्यांचे ‘आर्ट मेला’ हे प्रदर्शन त्यांच्यातील सुप्त कलागुणांचे दर्शन घडवते. पॉटरी (मातीकाम), आर्ट मेला मधील चित्र, शिल्प, पेटिंग हे एखाद्या व्यवसायिक कलावंताच्या तोडीचे आहेत.

सदर प्रदर्शनात विशेषत्वाने उल्लेख करावा अशी एक रचना करण्यात आली ज्यामध्ये इयत्ता ९ चे विद्यार्थी रोहन पोतदार, चिन्मय पाटीदार आणि दिव्यांश बेद यांनी पॉटरी माध्यमातून साकारलेली ‘नो ट्री – नो बर्डस्’ (जिथे आधार संपतो, तिथे श्वासही थांबतो) ही इंस्टॉलेशन रचना विशेष उललेखनीय आहे. माती कामातून तयार केलेल्या पक्ष्यांना एका मृत झाडाच्या खोडाजवळ त्यात मृतावस्थेत दाखवण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या संकल्पनेनुसार आजकालच्या धकाधकीच्या जीवनात तथाकथित विकास वाटेवरून चालत असताना माणसाने सिमेंटची जंगले तयार करत निसर्गाची आतोनात हानी केली आहे. सदर मांडणी शिल्पामध्ये मृत झालेल्या झाडाजवळ पडलेले मृत पक्षी म्हणजे दुसरे-तिसरे कुणी नसून आपण सर्व म्हणजेच मानवजात असा व्यापक संदेश देणारी ही कलाकृती संपूर्ण प्रदर्शनामध्ये लक्ष वेधून घेत आहे. विद्यार्थ्यांच्या निरागस भावविश्वातून प्रकट झालेली ही रचना प्रबोधनात्मक संदेश देत विचार करायला भाग पाडणारी आहे.
कॅनवास तसेच कागदावरील चित्रकला, पेस्टल रंग, स्टेन ग्लास, चारकोल-पेन्सिल अशा विविध माध्यमातून निसर्ग, शाळा, व्यक्तिचित्र, मांडणीचित्र, परिसर, संस्कृती, कल्पनाविलास यासह पर्यावरण हे सर्व काही या प्रदर्शनात सर्वांगसुंदर, सुबक पद्धतीने शाळेच्या निर्सगरम्य परिसरात मांडण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी प्रोत्साहन महत्त्वाचे असते ते अनुभूती निवासी स्कूलच्या कला विभागातील शिक्षकांकडून, व्यवस्थापनाकडून सातत्याने मिळत असते त्यातून अशा कलाकृतींची निर्मिती वर्षभर होत असते.
विविध कलांचा अभ्यास करून निर्माण केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन असलेला ‘आर्ट मेला’ चे आर्ट अॅण्ड क्राफ्ट विभाग परिसरात दि. १ एप्रिल रोजी उद्घाटन करण्यात आले. सदर प्रसंगी अनुभूती स्कूलचे संचालक अतुल जैन, संचालिका निशा अनिल जैन, डॉ. भावना अतुल जैन, प्राचार्य देबासिस दास, कला शिक्षक प्रीतम दास, प्रितोम खारा, अनुभुती स्कूलचे शिक्षक तसेच पालक वृंद व रसिक विद्यार्थ्यांनी केलेल्या त्यांच्या ‘भाव चित्र विश्वात’ जावून त्यांच्या विविध कलांचा ’आनंद शोध’ घेत होते. अनुभूती निवासी शाळेतील इ. ५ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या निवडक कलाकृती या प्रदर्शनात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here