एम.जे. मार्केटमध्ये कचऱ्याचे ढीग; स्वच्छतेच्या दाव्यांवर नागरिकांचा सवाल
साईमत /रावेर /प्रतिनिधी
शहर स्वच्छतेसाठी विविध अभियान राबविण्याचा दावा नगरपालिका प्रशासनाकडून केला जात असला, तरी प्रत्यक्ष परिस्थिती मात्र वेगळेच चित्र दर्शवत आहे. रावेर शहरातील बसस्थानकासमोरील महत्त्वाच्या एम.जे. मार्केट परिसरात स्वच्छतेअभावी घाणीचे साम्राज्य पसरले असून, नागरिकांसह व्यापारी व प्रवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, याच एम.जे. मार्केटच्या वरच्या मजल्यावर नगरपालिका कार्यालय कार्यरत आहे. मात्र, कार्यालयाच्या पायथ्याशीच कचऱ्याचे ढीग आणि अस्वच्छतेचे चित्र दिसून येत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दररोज हजारो नागरिकांची वर्दळ, तरीही स्वच्छतेकडे दुर्लक्ष
एम.जे. मार्केट हा रावेर शहरातील प्रमुख व्यावसायिक आणि वर्दळीचा परिसर आहे. बसस्थानकासमोर असल्याने या ठिकाणी दररोज मोठ्या संख्येने नागरिक, व्यापारी, ग्राहक तसेच प्रवाशांची ये-जा असते. मात्र, परिसरात साचलेला कचरा, अस्वच्छता आणि निर्माण झालेली दुर्गंधी यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
व्यापाऱ्यांसह नागरिकांनी अनेकदा परिसरातील स्वच्छतेबाबत लक्ष वेधले असतानाही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.
स्वच्छता अभियानाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह
शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी असलेल्या नगरपालिका प्रशासनाच्या कार्यालयाखालीच अस्वच्छतेचे चित्र दिसत असल्याने स्वच्छता मोहिमेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात असताना कार्यालय परिसरातीलच ही अवस्था चिंताजनक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
कायमस्वरूपी स्वच्छता व्यवस्थेची मागणी
एम.जे. मार्केट परिसराची तातडीने स्वच्छता करून साचलेला कचरा हटवावा, तसेच नियमित कचरा संकलन आणि विल्हेवाटीची प्रभावी व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नगरपालिका प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नगरपालिका प्रशासन आपल्या कार्यालयाच्या परिसरातील या अस्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कार्यवाही करणार का, याकडे आता रावेरकरांचे लक्ष लागले आहे.
