साईमत न्यूज नेटवर्क –
छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगरहून इचलकरंजीकडे निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला शुक्रवारी सकाळी अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे आणि मागून येणाऱ्या कारचालकाच्या सतर्कतेमुळे बसमधील सर्व ३८ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी बस पूर्णपणे जळून खाक झाली.
ही घटना शुक्रवारी सकाळी सुमारे ८.३० वाजता पांढरी पिंपळगाव परिसरात घडली. इचलकरंजी आगाराची (एमएच ०९ एफएल ८१३४) बस सकाळी ७.३० वाजता संभाजीनगरहून इचलकरंजीकडे रवाना झाली होती. प्रवासादरम्यान बसच्या मागील भागातून धूर निघत असल्याचे मागून येणाऱ्या एका कारचालकाच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने बसचालकाला याची माहिती दिली.
धोका ओळखत चालकाने बस तात्काळ रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यानंतर चालक आणि वाहकाने सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवले. काही प्रवाशांना संकटकालीन दरवाजातून बाहेर काढण्यात आले. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण बस आगीत भस्मसात झाली.
घटनेची माहिती मिळताच संभाजीनगर आगारातील यंत्र अभियंता आणि तांत्रिक पथक घटनास्थळी रवाना झाले. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू असून, सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.
एसटी वाहकाची बॅग चोरीला
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती बस स्थानकात एसटी वाहकाची बॅग चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री बसमध्ये झोपलेल्या वाहकाची बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केली. या बॅगेत एसटी महामंडळाचे तिकीट मशीन, मोबाईल, पॉवर बँक, महत्त्वाची कागदपत्रे आणि रोख रक्कम असा एकूण ३७ हजार ७०० रुपयांचा ऐवज होता.
या प्रकरणी धुळे आगारातील वाहक महेंद्र यशवंत चौधरी (वय ४२) यांनी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, बसचे दरवाजे आणि खिडक्या आतून बंद असतानाही चोरट्याने बसमध्ये प्रवेश करून बॅग चोरून नेली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून हवालदार इरफान खान या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
