पहुर कसबेतील ग्रामसभेत केंद्र सरकारसह पंतप्रधानांच्या अभिनंदनाचा एकमुखी ठराव पारित

0
24

पहुर कसबेतील ग्रामसभेत केंद्र सरकारसह पंतप्रधानांच्या अभिनंदनाचा एकमुखी ठराव पारित

साईमत/पहुर, ता. जामनेर/प्रतिनिधी

येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात नुकतीच ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेत केंद्र सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा एकमुखी ठराव पारित करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी सरपंच शंकर जाधव होते. प्रारंभी उद्योजक तथा दानशूर व्यक्तिमत्व टाटा उद्योग समूहाचे आधारवड स्व.रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी अशोक बाविस्कर यांनी केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मांडला होता. ठरावाला सर्वानुमते संमती देण्यात आली. ऐतिहासिक आणि प्राचीन परंपरा लाभलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मायबोलीचा सन्मान वाढला आहे, असे गौरवोद्गार कवी तथा उदयोन्मुख लेखक शंकर भामेरे यांनी काढले.
परिसरातील वाढत्या चोऱ्या थांबविण्याची मागणी

गावाचा वाढता विस्तार पाहता आपल्या गावात वैकुंठ रथ सुविधा मिळणे आवश्यक आहे. शव विच्छेदन झाल्यानंतर मृतदेह घरापर्यंत नेतांना नातेवाईकांचे अत्यंत हाल होतात. या पार्श्वभूमीवर शववाहिका सुविधा मिळणे गरजेचे आहे. पहुर कसबे गावाच्या प्रवेशद्वारापासून स्मशानभूमीपर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दयनीय स्थिती झाली आहे.

रस्त्याची त्वरित दुरुस्ती व्हावी, गावात भरदिवसा सुरू असणारे विजेचे दिवे वेळोवेळी बंद करून विजेचा होणारा अपव्यय टाळावा, ग्रामपंचायत कार्यालयात माहिती अधिकार कायद्याअंतर्गत दर्शनी भागात फलक लावण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ईश्वर हिवाळे यांनी केली. तसेच पहुर आणि परिसरात होणाऱ्या वाढत्या चोऱ्या थांबविण्यासाठी, पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंदे बंद व्हावेत, पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात यावी, अशी ग्रामस्थांनी मागणी केली.

यांची होती उपस्थिती

याप्रसंगी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष अर्जुन लहासे, माजी सरपंच लक्ष्मण गोरे, उपसरपंच राजू जाधव, ग्रामपंचायत सदस्य विक्रम घोंगडे, शिवाजी राऊत, विश्वनाथ घोंगडे, दिनकर पवार, पुंडलिक लहासे, बाळू सुरळकर, सुभाष धनगर, मधुकर बनकर, भानुदास जाधव, पुंडलिक भडांगे, किरण जाधव, शरीफुद्दीन शेख, सुनील लहासे, ईश्वर बनकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here