मनमानी कारभाराचा आरोप ; १४ संचालक सहलीवर रवाना
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शामकांत बळीराम सोनवणे यांच्याविरुध्द बाजार समितीच्या १४ संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे बुधवारी, ६ ऑगस्ट रोजी अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. सभापतींविरुध्द अविश्वास प्रस्ताव सादर केल्यानंतर १४ संचालक लगेच सहलीवर रवाना झाले आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी अशा अविश्वास प्रस्तावाने शिवसेना उबाठाला मोठा धक्का बसला आहे. ही राजकीय खेळी महायुतीच्या माध्यमातून झाल्याचे सांगितले जात आहे.
बाजार समितीच्या १४ संचालकांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सादर केलेल्या प्रस्तावात म्हटले आहे की, बाजार समितीचे सभापती शामकांत सोनवणे यांचे समितीच्या संचालकांशी वागणे बेजबाबदारीचे आहे. संचालक मंडळाला विश्वासात न घेता मनमानी पध्दतीने कामकाज करत आहेत. त्यामुळे सभापतींवर आमचा विश्वास राहिलेला नाही. म्हणून त्यांच्यावर आम्ही अविश्वास प्रस्ताव आणला आहे. त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करुन त्यांना तात्काळ सभापती पदावरुन मुक्त करावे, असे दिलीप काशिनाथ कोळी, सुनील सुपडू महाजन, मनोज दयाराम पाटील, लक्ष्मण गंगाराम पाटील, योगराज सपकाळे, अरुण पाटील, पांडुरंग पाटील आदी १४ सदस्यांनी दाखल केलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. जळगाव बाजार समितीत १८ संचालक आहेत. त्यापैकी १४ संचालकांनी सभापतींविरुध्द अविश्वास प्रस्ताव आणल्यामुळे हा प्रस्ताव बहुमताने आणल्याचे मानले जात आहे.