चाळीसगावला भरधाव ट्रकच्या धडकेत हॉटेल कामगार ठार

0
2

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

नांदगावकडून धुळेकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने वयोवृद्धाला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात तो ठार झाल्याची घटना खडकी बायपासला घडली. याप्रकरणी हॉटेल व्यावसायिक यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.

सविस्तर असे की, तालुक्यातील देवळी येथील अशोक शांताराम मराठे (वय ६५, रा.देवळी, ता.चाळीसगाव) हे चाळीसगावला एका हॉटेलात वेटर म्हणून कामाला आहे. ते सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास रस्ता ओलांडताना त्यांना अचानक टाटा कंपनीच्या भरधाव ट्रकने (क्र. एम.एच. आर.जे ११ जीसी ०५१३) जोरदार धडक दिली. त्यात ते जागीच ठार झाले. त्यानंतर ट्रक चालक हा भरधाव वेगाने धुळ्याच्या दिशेने ट्रकसह पसार झाला होता. त्याची माहिती चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहा.पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांनी ट्रक चालकाचा शोध घेण्यासाठी संबंधितांना सूचना दिल्या.

पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी पी.एस.आय. सुहास आव्हाड, पो.कॉ.विजय महाजन, शरद पाटील, प गणेश कुंवर, नंदुकिशोर महाजन यांना घटनास्थळी जावून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यासाठी कळविले. चाळीसगाव-धुळे बायपास रस्त्यावरील द्वारका हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून त्याआधारे ट्रकचा प्रकार लक्षात आला. ट्रक धुळेकडे गेल्याचे लक्षात आल्याने लागलीच खडकी टोल येथील सीसीटीव्ही कॅमेरा तपासला. तेव्हा ट्रकचा क्र. आरजे-११-जीसी-०५१३ असल्याची माहिती प्राप्त झाली. ट्रक चालकाचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे सर्व फुटेज व फोटो लागलीच कर्मचाऱ्यांनी प्राप्त करुन घेतले. ट्रक चालक हा शिरपूर टोल नाक्यावर भरधाव वेगात येत असतांना नाकाबंदी ठिकाणी हजर असलेले पो.ना. तुळशीराम पाटील यांनी त्यास ओळखुन लागलीच शिताफीने रात्री १०.५० वा. अडवून ट्रक चालकास पकडले. ट्रकच्या मागावर असलेल्या चाळीसगाव शहर पो.स्टे.च्या पथकाने लागलीच त्याठिकाणी जावून ताब्यात घेवून चाळीसगाव शहर पो.स्टे.ला ट्रक चालकासह हजर केले.

ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल

अपघाताची घटना पाहणारे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार शोधुन त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन चाळीसगाव शहर पो.स्टे. येथे ट्रक चालक जावेद खान राजु खान (वय २५, रा. देवला, ता.जि.नुह हरियाणा) याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. ट्रक चालकाचा वेळेत शोध घेतल्याबद्दल खडकी बु.ग्रामस्थांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत.

खडकी बु.गावात लवकरच कॅमेरे बसविणार

सीसीटीव्ही कॅमेराचे महत्त्व आजच्या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाले आहे. चाळीसगाव-धुळे बायपास रस्त्यावरील द्वारका हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद झाली नसती तर ट्रक चालक हा पसार झाला असता. यामुळे खडकी बु.गावात लवकरच गावाच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार असल्याचे सरपंच सचिन पवार, उपसरपंच धनजंय मांडोळे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here