जळगावात भव्य संगीतमय शिवमहापुराण कथेचे गुरुवारपासून आयोजन

0
31

साईमत, प्रतिनिधी जळगाव

शहरातील नेरीनाका पांझरापोळ येथे श्रावण महिन्यानिमित्त भव्य पाच दिवसीय संगीतमय शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. कथोत्सवाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत हा पवित्र संगीतमय शिव महापुराण कथा महोत्सव साजरा होणार असल्याची माहिती आयोजन समितीचे प्रशासक विशाल सुरेश भोळे यांनी दिली.

श्रावण मासानिमित्त्ा उत्तर प्रदेशातील श्रीधाम वृंदावन येथून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय शिव कथाकार महामंडलेश्वर संत श्री बृजभूषणजी शास्त्री यांच्या मुखातून संगीतमय शिव महापुराण कथा सादर होईल. या शिवकथेचे अमृत श्रवण करण्याचे पुण्य लाभण्यासाठी भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य संयोजक आमदार सुरेश दामू भोळे उर्फ राजूमामा यांनी सोमवारी सायंकाळी कथास्थळी पाहणी दरम्यान केले. यावेळी दादाजी फाउंडेशनच्या योगिता माळवी, उमेश माळवी (भावसार), सामाजिक कार्यकर्ते अशोक जाजू, राजू बांगर, श्याम जोशी, डॉ.वीरेंद्र खडके, बापू खडके, विजय वानखेडे, मयूर कापसे यांच्यासह अश्विनी महिला मंडळ प्रेमनगर जळगावच्या विद्या जोगळेकर, वैशाली शिरोडे, चित्रा सोमाणी, ज्योती दहाड आदी उपस्थित होते.

दररोज मुख्य यजमानांच्या हस्ते आरती व प्रसाद वाटप होईल. शहरातील नेरी नाका परिसरातील पांझरापोळ संस्थानच्या मैदानात सुमारे ३ हजार स्क्वेअर फूट जागेत ४० फूट बाय २४ फुटाचे भव्य स्टेज व भाविकांसाठी वॉटरप्रूफ बैठक व्यवस्थेसह सुसज्ज तयारी करण्यात आली आहे. हा पाच दिवसीय कथाविधी पांझरापोळ येथे संपन्न होत आहे. ८ सदस्यीय संगीत मंडळ कथास्थळावर भाविकांना आपल्या सुमधुर आवाजात भजने सादर करीत मंत्रमुग्ध करणार आहे. कथास्थळी सुमारे दीड हजारांहून अधिक भाविकांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कथास्थळी २ मोठे एलईडी स्क्रीनही लावण्यात येणार आहे. पाचव्या दिवशी महाप्रसाद वाटप होईल. तरी जास्तीत जास्त भाविकांनी कथास्थळी उपस्थित राहून कथा श्रवण करावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here