वर्षाकाठी मिळताहेत वीस लाखांचे उत्पन्न, शेतकरी देताहेत बागेला भेट
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील तळेगाव येथील शेतकरी रमेश सखाराम जिरी यांनी परिसरातील भरड जमिनीत नारळ शेतीचा प्रयोग यशस्वी करुन दाखवून ‘नारळाची’ शेती साकारली आहे. त्यातून त्यांना वर्षाकाठी वीस लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक न घेता आता नवीन फळबाग किंवा पिकांकडे वळला पाहिजे, असे यावरुन स्पष्ट होत आहे.
सव्वा दोन एकर म्हणजे ८९ आरमध्ये त्यांनी ४५० झाडे लावली आहे. एका झाडाला एका बहरला कमीत कमी २०० नारळे लागतात. असे सहा ते सात बहर वर्षभरात नारळाला येतात. कमीत कमी एका झाडाला एक हजार नारळ धरली. त्यांची सरासरी किंमत दहा रुपयाप्रमाणे जरी पकडली तरी त्यांना एक हजार नारळ एका झाडाला वर्षाकाठी येतात. असे ४५० झाडे आहे. त्यांना ४ लाख ५० हजार नारळ येतात. दहा रुपयाप्रमाणे त्यांची किंमत ४५ लाख रुपये होते. कमीत कमी अजून कमी पकडले तरी एकरी वीस लाख रुपये वर्षाकाठीचे उत्पन्न कसेही होते, असे शेतकरी रमेश जिरी यांनी सांगितले.
त्यांनी ‘वानफेरलोटन’ पाण्याच्या नारळाची व्हरायटीची लागवड केली आहे. त्यांनी एका झाडाला तीन ते चार किलो वाळू टाकून पाचशे ते सहाशे ग्रॅम मीठ व इतर रासायनिक खताचा वापर केलेला आहे. त्यांची ही बाग आता पूर्णपणे भरली आहे. ती चांगल्या प्रकारे उत्पन्न देत आहे. तळेगाव परिसरासह तालुक्यातील एकमेव नारळाची यशस्वी बाग ठरली आहे. बहुतांश शेतकरी याठिकाणी बागेला भेट देण्यासाठी येत आहे.
नारळ शेतीचा प्रयोग यशस्वी
हलक्या जमिनीत पाण्याची उपलब्धता आहे. त्यामुळे नारळ शेतीचा प्रयोग करण्याचे ठरविले. त्यातून तो प्रयोग यशस्वी झाला आहे. आता चांगल्या प्रकारे उत्पन्न सुरू झाले आहे. बागेत आंतरपीक म्हणून सीताफळाची लागवडही केली आहे. येत्या दोन वर्षात उत्पन्न अजून वाढणार आहे.
-रमेश सखाराम जिरी, शेतकरी, तळेगाव