घटनास्थळी महसूल विभागाने केला पंचनामा
साईमत/सोयगाव/प्रतिनिधी
तालुक्यातील जरंडी मंडळात रविवारी रात्री साडे अकरा वाजता तुफान पावसाने सुरुवात केली. तब्बल ७० मिनिटांच्या मुसळधार पावसाने जरंडी मंडळात ६७ मी.मी.पाऊस झाला. घोसला शिवारात गट क्र-७४ मधील शेतात शेडवर गेलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून रात्री साडे अकरा वाजता त्याचा जागीच मृत्यू झाला. युवराज पूना गव्हांडे (वय ५५) असे वीज कोसळून ठार झालेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचे नाव आहे. घोसला शिवारातील गट क्र-७४ मध्ये रात्री नऊ वाजता जेवण करून शेडमध्ये झोपायला गेल्यावर रात्री झालेल्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळी महसूल विभागाने पंचनामा केला आहे.
गोंदेगावसह बनोटी परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने सर्व नद्या रात्री तीन वाजेपर्यंत दुथडी भरून वाहत होत्या. दरम्यान जरंडी मंडळातील १८ गावांना अतिवृष्टीच्या पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. घोसला शिवारातील पिके पाण्यात वाहून गेली आहे. कपाशीसह मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरी आदी पिकांचे नुकसान झाले आहे. जरंडी मंडळात १८ गावे बाधित झाली आहे. दरम्यान महसूल आणि कृषी विभागाने तातडीने पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश दिले आहे. तलाठी कृषी सहायक यांना दोन दिवसात नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश तहसीलदार मनीषा मेने जोगदंड यांनी दिले आहे.
जरंडी शिवारात केली नुकसानीची पाहणी
जरंडी गावातील नुकसानीच्या पाहणीसाठी तालुका कृषी अधिकारी मदन सिसोदिया, तहसीलदार मनीषा मेने-जोगदंड आदींनी जरंडी शिवारात सायंकाळी उशिरा नुकसानीची पाहणी केली. यावेळी कृषी मंडळ अधिकारी रमेश गुंडीले, कृषी पर्यवेक्षक समाधान चौधरी, शेतकरी राजू पाटील, प्रदीप पाटील, समाधान पाटील, दिलीप पाटील आदी उपस्थित होते.