रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल, एकास घेतले ताब्यात
साईमत/रावेर/ विशेष प्रतिनिधी
तालुक्यातील पाल येथे एक संशयित इसम स्वत: जवळ गावठी पिस्तूल घेवून मध्य प्रदेश राज्यातून पाल गावातून महाराष्ट्रात प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक गोपनीय माहिती रावेर पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे रावेर पोलीस स्टेशन हद्दीतील पाल दुरक्षेत्र अंतर्गत पाल ते खरगोन रस्त्यावरील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लावण्यात आलेल्या नाकाबंदीत जावून पोलिसांचे पथक कार्यवाही करत होते.
अशातच शनिवारी, २६ ऑक्टोबर रोजी रात्रीच तात्काळ पाल येथे रवाना होवून शेरी नाका येथील नाकाबंदी येथे थांबलो असतांना मध्यरात्रीच्या सुमारास मिळालेल्या माहितीप्रमाणे पेहराव केलेला इसम गावठी देशी बनावटीचे पिस्तूल विनापरवाना बेकायदेशीररित्या त्याच्या कब्जात बाळगतांना आढळून आला.
कारवाईत त्याला ताब्यात घेवून त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतल्यावर त्याच्याजवळील गावठी बनावटीचे १ रिव्हाल्वर दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यावरुन भरत गणेश सोनवणे (वय ३२, रा.वडोदा, ता.यावल, जि.जळगाव) यास ताब्यात घेवून त्यास रावेर पोलीस स्टेशन येथे पुढील कार्यवाहीसाठी घेवून आले. याप्रकरणी पो.कॉ. समाधान कौतीक ठाकुर यांच्या फिर्यादीवरुन रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदशनाखाली पीएसआय तुषार पाटील करीत आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, फैजपुरच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील, पो.हे.कॉ. संजय मेढे (चालक), पो.कॉ.समाधान ठाकुर, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विकार शेख, यांच्या पथकाने केली आहे.