भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील पंचशिल नगरातील मशीदजवळ जुन्या भांडणाच्या कारणावरून दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या सायकलला धडक देवून चाकूने वार करून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर असे की, शहरातील मटन मार्केटजवळ शाहीम शेख मुजाहिद (वय १६) हा विद्यार्थी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. तो सध्या दहावीचे शिक्षण घेत आहे. सोमवारी, २१ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता शाहीम शेख हा सायकलीने जात होता. तेव्हा शेख तौसिफ उर्फ बाबू शेख फिरोज दुचाकीने जात असतांना शाळकरी मुलाच्या सायकलला धडक दिली. त्याचा जाब विचारल्यावर शेख तौसिफ याने चाकू काढून पायावर व हातावर मारून दुखापत केली. तसेच रेहान शेख फिरोज, फिरोज शेख आणि शेरा उर्फ गोलू शेख फिरोज शेख (सर्व रा. पंचनिशल नगर, भुसावळ) यांनीही चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. जखमी झालेल्या शाहीम शेख याला भुसावळ ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. उपचार घेतल्यानंतर शुक्रवारी, २५ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. तपास महिला पो.हे.कॉ. अर्चना अहिरे करीत आहे.