साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी
कंटेनरमधून निर्दयतेने ५४ म्हशीचे पारडू (हेला) यांना कोंबून घेऊन जाताना तालुक्यातील डोलारखेडा फाट्याजवळ मुक्ताईनगर तालुका सनातन हिंदू समाज गोरक्षक व हिंदू समाज कार्यकर्ते यांनी कंटेनर बुधवारी, ६ डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास पोलिसांना पकडून दिला. दरम्यान, याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केली असून एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
सविस्तर असे की, तालुक्यातील डोलारखेडा फाट्याजवळून ६ डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान कंटेनर (क्र.आरजे ११ जीबी ९४८७) हा जात असताना गोरक्षक कार्यकर्त्यांनी कंटेनर थांबवून त्यामध्ये काय आहे, त्याची पाहणी केली. तेव्हा कंटेनरमध्ये ५४ म्हशीचे पारडू अंदाजे दोन वर्ष वयाचे कोंबून घेऊन जाताना आढळून आले. तसेच त्यांच्याजवळ कुठल्याही प्रकारचा वाहतुकीचा परवाना नसताना निर्दयपणे वाहतूक करताना मिळून आला. पोलिसांनी दोन लाख ७० हजार रुपये किमतीचे ५४ म्हशीचे पारडू व दहा लाख रुपये किमतीचा कंटेनर असा १२ लाख ७० हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. म्हशीचे पारडू यांना तालुक्यातील हरताळा येथील गोशाळेत दाखल केले आहे.
पोलीस कॉन्स्टेबल राहुल बेहेनवाल यांच्या फिर्यादीवरून आरोपी मोहम्मद अहसाल मोहम्मद अब्दुल गफार (रा.फिरोजपूर, जि.मेवाल, हरियाणा) आणि आजम खान अब्दुल हमीद (रा.बुरारखा, जि.मेवाल, हरियाणा) यांच्याविरुद्ध प्राण्यांना निर्दयीपणे वागण्यास प्रतिबंध केल्याने गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विजय पढार करीत आहे.