महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ; सागर पार्कमध्ये सहावा खान्देश महोत्सव
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
स्थानिक महिला बचत गट, उद्योजक आणि स्वयंसहाय्यता गटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जळगाव शहरात ‘खान्देश महोत्सव २०२६’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. येत्या २६ फेब्रुवारीपासून सागर पार्क येथे हा महोत्सव रंगणार असून ‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमातून स्थानिक उत्पादनांना नवे व्यासपीठ मिळणार आहे. नागरिकांना खान्देशच्या समृद्ध संस्कृतीचा आणि परंपरेचा अनोखा अनुभव या निमित्ताने घेता येणार आहे.
जळगाव महानगरपालिका आणि महिला व बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला हा सहावा महोत्सव २६ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. महापौर दीपमाला काळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी उपमहापौर मनोज चौधरी, उपायुक्त निर्मला गायकवाड आणि शहर अभियान व्यवस्थापक गायत्री पाटील उपस्थित होते. स्थानिक महिला बचत गट आणि महिला उद्योजकांसाठी हा महोत्सव एक महत्त्वाचा व्यासपीठ ठरणार असल्याचे महापौरांनी नमूद केले.
महोत्सवात एकूण १८० स्टॉल्स उभारण्यात येणार असून, महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध हस्तकला वस्तू, घरगुती सजावटीच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक ज्वेलरी, सौंदर्य प्रसाधने, किचन अप्लायन्सेस तसेच दैनंदिन वापराच्या उपयुक्त वस्तू नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. खान्देशी पद्धतीचे अस्सल शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थ हे देखील महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार असून, खाद्यप्रेमींना चविष्ट मेजवानीचा आनंद घेता येणार आहे.
खरेदीसोबतच नागरिकांच्या मनोरंजनासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. २८ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध अभिनेते ओम यादव यांच्या उपस्थितीत महिलांसाठी विशेष स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, यात पैठणी, राणीहार आणि आकर्षक भेटवस्तू जिंकण्याची संधी उपलब्ध होणार आहे. स्थानिक गायक, नृत्यगट आणि कलावंत आपली कला सादर करणार असून, लहान मुलांसाठी गेम झोन आणि जादूगाराचे प्रयोग हे विशेष आकर्षण ठरणार आहेत. उत्कृष्ट स्टॉलधारकांचा गौरव करून त्यांना उपयुक्त घरगुती वस्तूंची बक्षिसे देण्यात येणार आहेत.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी महोत्सवात प्लास्टिकमुक्तीचा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. नागरिकांना कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती उपमहापौर मनोज चौधरी यांनी दिली. स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देतानाच पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महापौर दीपमाला काळे यांनी जळगावकरांना आवाहन करताना सांगितले की, कुटुंबासह या महोत्सवात सहभागी होऊन स्थानिक महिला बचत गटांच्या उत्पादनांची खरेदी करावी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यास हातभार लावावा. स्थानिक कला, संस्कृती आणि उद्योजकतेचा उत्सव ठरणाऱ्या या ‘खान्देश महोत्सवा’ला जळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यशस्वी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
