साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर
भडगाव तालुक्यातील वाडे येथील सूर्यकांत रामदास चौधरी यांच्या शेतात बुधवारी, १२ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अचानक वीज कोसळून बैल ठार झाल्याची घटना घडली आहे. बैल मृत्यूमुखी पडल्याने त्यांचे सुमारे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
वाडे येथील शेतकरी सूर्यकांत चौधरी यांनी निंबाच्या झाडाखाली बैल जोडी बांधली होती. त्यातील एका बैलावर वीज पडल्याने बैल जागीच मृत्यूमुखी पडला. यावेळी त्यांनी समोर असणाऱ्या पत्राच्या शेडमध्ये आडोशाला बसले होते. तेव्हा मुलाबाळाप्रमाणे जपलेल्या बैलाचा स्वतःच्या डोळ्यादेखत वीज पडून बैलाचा मृत्यू झाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढले आहे. सध्या मशागतीचे कामे सुरु असताना बैल मृत्यूमुखी पडल्याने शेतकऱ्याचा शोक अनावर झाला होता. शेतकऱ्याला शासकीय नुकसान भरपाई मिळावी, म्हणून तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच यांनी त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यास आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी वाडे ग्रामस्थांकडून होत आहे.