प्रशासकीय कामकाजावर राजकीय दबाव? कर्मचाऱ्याला शिवीगाळ; चौकशीची मागणी
साईमत /सावदा, ता. रावेर / प्रतिनिधी :
सावदा नगरपालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात एका प्रशासकीय कर्मचाऱ्यावर सत्ताधारी पदाधिकाऱ्याकडून दबाव आणून कथितरीत्या अरेरावी, शिवीगाळ आणि निलंबनाची धमकी दिल्याचा प्रकार १८ ऑगस्ट रोजी घडल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. एका जवळच्या व्यक्तीच्या जन्मदाखल्यातील दुरुस्तीच्या कारणावरून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात असून, या घटनेमुळे पालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, १८ ऑगस्ट रोजी कार्यालयीन वेळेत जन्म-मृत्यू नोंदणी विभागात एका प्रमुख सत्ताधारी पदाधिकाऱ्याने संबंधित जन्मदाखल्यातील दुरुस्तीच्या मुद्द्यावरून उपस्थित कर्मचाऱ्याशी जोरदार बाचाबाची केल्याचे सांगितले जात आहे. यावेळी संबंधित कर्मचाऱ्यावर कथितरीत्या आरोप करण्यात आले तसेच शिवीगाळ आणि अरेरावीची भाषा वापरल्याची चर्चा आहे. एवढ्यावरच न थांबता कर्मचाऱ्याला निलंबित करण्याची उघड धमकीही देण्यात आल्याचा आरोप आहे.
या संपूर्ण प्रकाराची माहिती एका प्रत्यक्षदर्शीने नाव न सांगण्याच्या अटीवर दिल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर पालिका वर्तुळात या प्रकाराबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, प्रशासकीय कामकाजात राजकीय हस्तक्षेप कितपत योग्य, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सावदा नगरपालिकेला अनेक वर्षांची राजकीय आणि सामाजिक परंपरा लाभली आहे. पालिकेत यापूर्वी विविध राजकीय मतभेद, वाद आणि सत्तांतर झाले असले तरी प्रशासकीय कर्मचाऱ्याशी कार्यालयीन दालनात अशा पद्धतीने कथित अरेरावी झाल्याची घटना यापूर्वी ऐकिवात नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे या प्रकारामुळे पालिका प्रशासनाची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
जन्म-मृत्यू नोंदणीसारख्या महत्त्वाच्या विभागात नागरिकांची कामे नियमांनुसार आणि कागदपत्रांच्या आधारे केली जातात. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या दाखल्यातील दुरुस्ती अथवा नोंदणी प्रक्रियेत संबंधित नियमांचे पालन करणे आवश्यक असते. अशा परिस्थितीत प्रशासकीय कर्मचाऱ्यांवर राजकीय दबाव आणला जात असल्यास त्याचा थेट परिणाम पालिकेच्या कामकाजावर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, संबंधित कर्मचाऱ्याने या प्रकाराबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे किंवा नाही, तसेच घटनेची अधिकृत नोंद झाली आहे का, याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध झालेली नाही. संबंधित पदाधिकाऱ्यांची बाजूही अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या आरोपांची अधिकृत चौकशी होऊन वस्तुस्थिती स्पष्ट होणे आवश्यक आहे.
पालिका प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियमांनुसार काम करण्याचे स्वातंत्र्य मिळणे आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अनुचित दबाव येऊ नये, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या कथित प्रकाराची चौकशी करून दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणीही पालिका वर्तुळातून पुढे येत आहे.
