कानबाई माता उत्सवादरम्यान डीजेवर नाचल्यानंतर पाणी प्यायला बसला आणि; काही क्षणांतच मृत्यू
पारोळा तालुक्यातील सबगव्हाण खुर्द येथे कानबाई माता उत्सवादरम्यान २५ वर्षीय तरुणाचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना घडली. राकेश धनसिंग गिरासे असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या अचानक निधनामुळे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सबगव्हाण खुर्द येथे १७ ऑगस्ट रोजी कानबाई माता उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास राकेश गिरासे हा कार्यक्रमात सहभागी झाला होता. डीजेच्या तालावर नृत्य केल्यानंतर तो घराच्या ओट्यावर पाणी पिण्यासाठी बसला. यावेळी त्याने अचानक मान खाली टाकली. त्याची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच कुटुंबीय व उपस्थितांनी त्याला तातडीने पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले.
मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर राकेश याला मृत घोषित केले. या घटनेने उत्सवाच्या आनंदावर विरजण पडले. तरुणाच्या अचानक आणि अकाली मृत्यूची वार्ता समजताच कुटुंबीयांसह नातेवाईक व ग्रामस्थांना मोठा धक्का बसला.
या प्रकरणी पारोळा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे. राकेशच्या अकाली निधनामुळे सबगव्हाण खुर्द परिसरात शोककळा पसरली आहे.
