राहत्या घरातच घेतला गळफास ३१ वर्षीय तृतीयपंथीयने ; वरणगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
साईमत /वरणगाव/ प्रतिनिधी :
फुलगाव येथे ३१ वर्षीय तृतीयपंथीयाचा राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत्यू झाल्याची घटना १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी उघडकीस आली. तुषार (तानिया) उर्फ अनंत बाऊस्कर असे मृताचे नाव आहे. या घटनेप्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार उर्फ तानिया बाऊस्कर हे फुलगाव येथील रहिवासी होते. १६ ऑगस्ट रोजी ते राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर पंख्याच्या हुकला साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. ही घटना निदर्शनास येताच कुटुंबीय व नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक रियाज शेख यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
घटनेची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल गणेश राठोड पुढील तपास करीत आहेत. मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस तपासातून त्याबाबत अधिक माहिती समोर येणार आहे.
