साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित टी-२० क्रिकेट स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या ‘ब्लू’ संघाने शानदार कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. अंतिम सामन्यात ‘ब्लू’ संघाने जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्याच ‘ग्रीन’ संघाचा ६४ धावांनी दणदणीत पराभव केला.
‘ब्लू’ संघाची जोरदार फलंदाजी
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना जैन स्पोर्ट्स ‘ब्लू’ संघाने २० षटकांत ६ बाद १७१ धावांचा डोंगर उभारला. क्रिषी नथानी याने अवघ्या २१ चेंडूंत ४ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ५० धावांची आक्रमक अर्धशतकी खेळी केली, तर लोकेश पाटीलने ४५ चेंडूंत ५३ धावांचे मोलाचे योगदान दिले. १७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ‘ग्रीन’ संघाला २० षटकांत ८ बाद १०७ धावांपर्यंतच मजल मारता आली. ‘ग्रीन’ संघाकडून जितेंद्र नाईक (३९ धावा) आणि पुर्वेश चौधरी (३१ धावा) यांनी लढा दिला, मात्र ‘ब्लू’ संघाच्या अचूक गोलंदाजीसमोर इतर फलंदाज टिकू शकले नाहीत. फलंदाजीत चमकणाऱ्या क्रिषी नथानी याला ‘सामनावीर’ घोषित करण्यात आले.
स्पर्धेतील वैयक्तिक पुरस्कार
सामनावीर (अंतिम सामना): क्रिषी नथानी
मालिकावीर (मॅन ऑफ द सिरीज): मोहम्मद नोमान (१४८ धावा आणि हॅट्रिकसह ७ बळी)
उत्कृष्ट फलंदाज: अक्षय मेघानी (५ सामन्यांत १९० धावा)
उत्कृष्ट गोलंदाज: मोहम्मद सैफ (५ सामन्यांत ९ बळी)
जेसीएल टी-२० स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पुर्वेश चौधरी याला जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांच्यातर्फे घोषित करण्यात आलेली बॅट व क्रिकेट किट मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
पारितोषिक वितरण समारंभास जैन इरिगेशनचे मीडिया व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे व्हाईस प्रेसिडेंट युसूफ मकरा, खजिनदार राजेंद्र लढ्ढा, सचिव अरविंद देशपांडे आणि मुख्य प्रशिक्षक सुयस बुरकूल उपस्थित होते. मोहम्मद फजल यांनी सूत्रसंचालन केले.
१३ जुलैपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत २९ संघांनी भाग घेतला. एकूण २८ सामन्यांमध्ये फलंदाजांनी १७३ षटकार आणि ६२४ चौकारांच्या मदतीने ६,९०० धावा फटकावल्या, तर गोलंदाजांनी ४०५ फलंदाजांना तंबूत परतवले. संदीप जरे, प्रविण इंगोले, संतोष बडगुजर, मुश्ताक अली, पंकज पुरोहीत, मोहम्मद साद व मोहम्मद फजल यांनी पंच आणि गुणलेखक म्हणून जबाबदारी सांभाळली.
