माजी विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वजारोहण ज्या शाळेत घडला, त्याच शाळेत फडकविला तिरंगा
साईमत /चाळीसगाव / प्रतिनिधी :
बोरखेडा येथील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये देशाचा स्वातंत्र्यदिन देशभक्तीपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेचे माजी विद्यार्थी हर्षल गोरख पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. माजी विद्यार्थ्याच्या हस्ते झालेल्या ध्वजारोहणामुळे कार्यक्रमाला विशेष भावनिक आणि अभिमानाचा स्पर्श लाभला.
हर्षल पवार यांनी याच शाळेत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर तरवाडे माध्यमिक विद्यालयात माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. इयत्ता दहावीच्या परीक्षेत त्यांनी ८७.४० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला होता. शाळेच्या संस्कारातून घडलेल्या माजी विद्यार्थ्याच्या हस्ते स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण होणे, हा शाळेसाठी अभिमानाचा क्षण ठरला.
कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विश्वजीत खैरनार, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य डॉ. रवि मराठे, बिसाजनी ॲग्रोचे संचालक गोकुळ पिलोरे, राष्ट्रवादीचे युवानेते इंजि. चेतन पाटील, ग्रामपंचायत सदस्य अरुण पाटील, ह.भ.प. किरण मामाश्री, सामाजिक कार्यकर्ते राजू दादा, गोकुळ पाटील, भैय्यासाहेब चित्ते, न्हावे-ढोमणे गावाचे सरपंच वासुदेव खैरनार, उपसरपंच पप्पू पानमन, तरवाडेचे पोलीस पाटील जीवन पाटील, सिनेअभिनेते विजय पाटील, रवि चित्ते, व्यापारी आघाडीचे उपाध्यक्ष नितीनकुमार जैन, अल्केश जैन, बोरखेडा विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे चेअरमन एकनाथ चिंधा पाटील, व्हाईस चेअरमन सर्जराव पाटील, शांताराम पवार, संस्थेचे मार्गदर्शक पंडित सूर्यवंशी आणि प्रल्हाद रामदास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना इंजि. चेतन पाटील, विश्वजीत खैरनार आणि ह.भ.प. किरण मामाश्री यांनी स्वातंत्र्याचे महत्त्व विशद केले. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी देशातील असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्यागाचे स्मरण करून देत विद्यार्थ्यांनी देशाप्रती आपली जबाबदारी ओळखावी, असे आवाहन त्यांनी केले. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी चांगले संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रनिष्ठा जोपासणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन भूषण पाटील सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कल्याणी मॅडम, तेजू मॅडम, सुरेखा मॅडम, प्रियांका मॅडम, दीपाली मॅडम, गायत्री मॅडम आणि अरुण सर यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या सहभागामुळे स्वातंत्र्यदिनाचा सोहळा उत्साहात पार पडला.
