अयोध्या नगर परिसरातील लक्ष्मीनारायण नगरात घरफोडी; दीड ते दोन तोळे सोन्याचे दागिने लंपास कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश
साईमत /जळगाव/ प्रतिनिधी :
शहरातील घरफोडीच्या घटनांना आळा बसत नसताना अयोध्या नगर परिसरातील लक्ष्मीनारायण नगरात मध्यरात्री चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा तोडून घरफोडी केल्याची घटना सोमवारी (१७ ऑगस्ट) सकाळी उघडकीस आली. घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि कपाटातील दीड ते दोन तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लक्ष्मीनारायण नगरातील जिल्हा परिषदेचे कर्मचारी दीपक वराडे हे त्यांच्या मूळ गावी गाडेगाव (ता. जामनेर) येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. घरात कोणी नसल्याची माहिती मिळाल्यानंतर चोरट्यांनी मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी कपाटाची झडती घेतली. कपाटातील दीड ते दोन तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
दरम्यान, सोमवारी सकाळी शेजाऱ्यांच्या निदर्शनास घराचा दरवाजा उघडा असल्याचे आले. त्यांनी वराडे यांना घटनेची माहिती दिल्यानंतर घरफोडी झाल्याचे उघड झाले. घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांमध्ये खळबळ उडाली.
शहरातील विविध भागांत चोरी व घरफोडीच्या घटना घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. लक्ष्मीनारायण नगरातील या घरफोडीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. घरफोडी करणाऱ्या आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील हालचाली तसेच उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास केला जात आहे.
