साईमत -रावेर- प्रतिनिधी |
जिद्द, चिकाटी आणि आईच्या कष्टांबद्दल असलेली कृतज्ञतेची भावना असेल तर कोणतीही अडचण यशाचा मार्ग रोखू शकत नाही, हे रावेरच्या कांचन जयंत महाजन यांनी सिद्ध करून दाखवले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेतून कांचन यांची ‘एसटीआय’ (State Tax Inspector – राज्य कर निरीक्षक) पदी निवड झाली असून त्यांनी ओबीसी (OBC) प्रवर्गातून २३ वा क्रमांक पटकावला आहे.
तब्बल १९ वर्षांपूर्वी वडिलांचे छत्र हरपल्यानंतर कांचन यांच्या कुटुंबावर संकटांचा डोंगर कोसळला होता. मात्र, आई हेमलता महाजन यांनी हार न मानता खंबीरपणे परिस्थितीचा सामना केला. उन्हा-पावसाची तमा न बाळगता शेतात मजुरी करून त्यांनी मुलगा आणि मुलीच्या शिक्षणाचा गाडा ओढला. आईच्या याच अपार संघर्षाचे मोल ओळखून कांचन यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीला स्वतःला झोकून दिले.
अनेक आव्हानांवर मात करत कांचन यांनी अखेर एमपीएससीच्या अंतिम गुणवत्तेत आपले स्थान निश्चित केले. त्यांच्या या यशाने शेतमजुरी करणाऱ्या आईच्या घामाचे खऱ्या अर्थाने सोने झाले आहे.
”माझ्या आईने शेतात मजुरी करून, स्वतः त्रास सहन करत आम्हाला शिकवले. तिच्या संघर्षातूनच मला लढण्याची प्रेरणा मिळाली. आज मिळालेले हे यश पूर्णपणे माझ्या आईच्या कष्टांना आणि त्यागाला समर्पित आहे.”
— कांचन महाजन (निवड: राज्य कर निरीक्षक)
कांचन यांच्या या दैदिप्यमान यशामुळे रावेर परिसर व संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पुढे जाणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्या एक प्रेरणास्रोत ठरल्या आहेत.
