जनरल अरुण वैद्य चौकात सेवामुक्त रणगाडा उभारणार; स्वातंत्र्यदिनी मनसेकडून संकल्पचित्र साकार
साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांचे शौर्य पुढील पिढ्यांच्या मनात जिवंत राहावे, या उद्देशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ‘आमचे शहर, आमचा अभिमान’ या अभियानाअंतर्गत शहरात महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जळगावातील जनरल अरुण वैद्य चौकात (आकाशवाणी चौक) सेवामुक्त रणगाडा स्थापित करण्याचा संकल्प मनसेच्या वतीने करण्यात आला असून, स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून या ठिकाणी प्रस्तावित रणगाड्याचे भव्य संकल्पचित्र साकारण्यात आले.
रणगाडा आणि राष्ट्रध्वजाची भव्य संकल्पना साकारत या चौकाला देशभक्ती आणि शौर्याचे एक नवे प्रतीक बनवण्याचा प्रयत्न मनसेने केला आहे. शहरातील चौक हे केवळ वाहतुकीचे केंद्र न राहता, त्यांना इतिहासाची आणि शौर्याची ओळख असावी, अशी भूमिका यामागे व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, डॉ. अनुज पाटील, ललित शर्मा, प्रकाश जोशी आणि प्रदीप पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.
याप्रसंगी शिवसेना (ठाकरे गट) नेते गजानन मालपुरे, राहुल चव्हाण, खुशाल ठाकूर यांच्यासह मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक आणि नागरिक उपस्थित होते.
