साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त जळगाव शहर महानगरपालिकेत मुख्य ध्वजारोहण सोहळा अत्यंत उत्साही व देशभक्तीपूर्ण वातावरणात पार पडला. महापालिका प्रांगणात महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी ‘वंदे मातरम’, राष्ट्रगीत आणि ‘भारत माता की जय’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
या सोहळ्याला महापालिका आयुक्त आदित्य जीवने, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपमहापौर मनोज चौधरी आणि स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
नागरिकांच्या सहभागाशिवाय विकास अपूर्ण: महापौर दीपमाला काळे
ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना महापौर दीपमाला काळे यांनी शहरवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या, “देश आज विज्ञान, तंत्रज्ञान आणि प्रगतीच्या नव्या शिखरावर पोहोचत आहे. या विकासात जळगाव शहराचा आणि नागरिकांचा वाटा अत्यंत मोलाचा आहे. जळगावला अधिक स्वच्छ, हरित, सुरक्षित आणि समृद्ध बनवणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे. त्यासाठी मूलभूत सुविधांचा विस्तार, बळकट आरोग्य सेवा, दर्जेदार शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे.”
पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, कोणताही विकास नागरिकांच्या सक्रिय सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. जळगावला देशातील सर्वोत्तम शहरांच्या यादीत नेण्यासाठी प्रत्येक नागरिकाने परिसराची स्वच्छता राखणे, वृक्षारोपण व संवर्धन करणे, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि कायद्याचे पालन करण्याचे संकल्प करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास भाजप गटनेते प्रकाश बालाणी, राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते प्रफुल्ल देवकर यांच्यासह सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विभाग प्रमुख, नगरसेवक आणि महापालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहण सोहळ्यानंतर उपस्थितांनी एकमेकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
